शरद पवार आणि महेश कोठे यांची बंद खोलीत चर्चा, पवार इज द पॉवर : महेश कोठे

0

सोलापूर,दि.९: आगामी महापालिकेची निवडणूक लक्षात घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली.

शुक्रवारी दुपारी, माजी महापौर महेश कोठे (Mahesh Kothe) यांच्या मुरारजी पेठेतील ‘राधाश्री’ या निवासस्थानी पवारांच्या भेटीसाठी गर्दी झाली होती. भेटणाऱ्यांमध्ये माजी खासदार धर्मण्णा सादूल, माजी आमदार निर्मलाताई ठोकळ, मार्कंडेय रुग्णालयाचे चेअरमन सत्यनारायण बोल्ली, माजी आमदार राजन पाटील, बळीराम साठे यांच्यासह दोन्ही काँग्रेसचे पदाधिकारी आणि काही नगरसेवक यांचा समावेश होता. महापालिका निवडणुकीचे गणित घातलेल्या काही जणांनीदेखील पवारांच्या भेटीसाठी ‘राधाश्री’ वर गर्दी केली होती.

दुपारी शरद पवार यांचे ‘राधाश्री’वर आगमन झाले. माजी महापौर महेश कोठे, नगरसेवक देवेंद्र कोठे यांच्यासह कोठे परिवारातील अन्य सदस्यांनी पवारांचे उत्साहाने स्वागत केले. यावेळी पवारांनी प्रत्येकाची ओळख करून घेत आस्थेने विचारपूसही केली. स्वर्गीय विष्णुपंत कोठे यांच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.

हेही वाचा राष्ट्रवादी पक्ष महेश कोठे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवण्याची शक्यता

यावेळी देवेंद्र कोठे मित्र परिवाराच्यावतीने सोलापूरचे वैभव असलेल्या वस्त्रोद्योग क्षेत्रातील शरद पवार यांचे छायाचित्र असलेली चादर भेट देण्यात आली. ही भेट पवारांनी आनंदाने स्वीकारली आणि त्याबद्दल प्रशंसाही केली. चादरीची विण आणि त्यावरची अक्षरे कौतुकाने वाचली. यानिमित्ताने त्यांनी सोलापूर शहरातील वस्त्रोद्योगातील सद्यः स्थितीची सादूल यांच्याकडून सविस्तर माहितीही जाणून घेतली.

स्वागताची औपचारिकता अटोपल्यानंतर शरद पवार यांनी राधाश्री वरच जेवण घेतले. त्यांचे जेवण बनवण्यासाठी खास बारामतीहून कुक बोलावण्यात आले होते.

वैद्यकीय सल्ल्यानुसार अत्यंत साधे जेवण त्यांनी घेतले. महेश कोठे यांनी पवारांची आवडनिवड लक्षात घेऊनच मेजवानीचा बेत आखला होता. प्रत्येक पदार्थाची चव चाखत पवारांनी त्याला मनमुराद दाद दिली. यावेळी उपस्थित असलेल्या इतर मान्यवरांसाठी मात्र शाकाहारीबरोबरच मांसाहारी पदार्थाची व्यवस्था करण्यात आली होती.

शरद पवार यांना कडक सुरक्षा व्यवस्था असल्याने ‘राधाश्री’वर मोजक्याच व्यक्तींना प्रवेश देण्यात आला होता. काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुधीर खरटमल ज्येष्ठ नगरसेवक यू. एन. बेरिया, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक मनोहर सपाटे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्यासह अनेकांना या सुरक्षा व्यवस्थेचा फटका बसला. काहीवेळ त्यांना ‘राधाश्री’च्या फाटकासमोर प्रतीक्षा करीत थांबावे लागले. पोलिसांशी संघर्ष करून त्यांनी प्रवेश मिळवला.

पवार इज द पॉवर

शरद पवार हे असे नेते आहेत की, ज्यांच्याकडे मोठी शक्ती आहे. ते ज्यांच्या पाठीशी उभे राहतात ती व्यक्ती मोठी होते. म्हणूनच पवार इज द पॉवर असे म्हणतात. आज ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. त्यांच्या माध्यमातून मी सोलापूर शहराचा विकास करेन याची खात्री वाटते. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्व पक्षातील काही मंडळी आज राष्ट्रवादी काँग्रेस पात आली आहेत. आणखी पंधरा दिवसानंतर शरद पवार पुन्हा सोलापूरला येतील तेव्हा आणखी चांगले लोक पक्षात येतील. वेगळे चित्र त्यावेळी पाहायला मिळेल,
महेश कोठे, माजी महापौर

महेश कोठेंशी बंद खोलीत चर्चा

शरद पवार यांनी ‘राधाश्री’वर महेश कोठे यांच्याशी काही वेळ बंद खोलीत चर्चा केली. यावेळी धर्मणा सादूल, सत्यनारायण बोल्ली, राजन पाटील वगळता इतरांना प्रवेश नव्हता. आगामी महापालिका निवडणुकीबाबत पवारांनी कोठे यांच्याशी चर्चा केली असल्याचे सांगण्यात आले. भाजपविरोधी पक्षांना सोबत घेऊन आघाडी केली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महापौर कसा येऊ शकतो, हे गणित महेश कोठे यांनी पवारांसमोर मांडले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here