सोलापूर,दि.४: Sharad Koli: शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) संत्रा पिऊन बोलतात की हातभट्टीवरील तांब्या मारून बोलतात, नेमके तेच कळत नाही असे म्हणत युवासेना नेते शरद कोळी (Sharad Koli) यांनी सडकून टीका केली आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांनी नुकतीच शिवसेनेवर टीका केली होती. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट आणि शिवसेनेत वारंवार शाब्दिक चकमक उडत आहे. नुकतेच बुलडाणा येथे शिवसेनेच्या कार्यक्रमात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याची घटना घडली आहे.
शरद कोळी (Sharad Koli) यांनी शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांच्यावर टीका करत, तुम्हाला शिवसेना स्टाइलनेच उत्तर देऊ, असा इशारा दिला आहे. शरद कोळी यांची युवासेनेच्या राज्य विस्तारकपदी निवड झाल्यापासून, ते सातत्याने शिंदे गटातील मंत्री, आमदारांवर जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहेत. यातच शरद कोळी यांनी शहाजीबापू पाटील यांच्यावर बोचरी टीका केली. मात्र, ही टीका करताना शरद कोळी यांची जीभ घसरल्याचे सांगितले जात आहे. ते संत्रा पिऊन बोलतात की हातभट्टीवरील तांब्या मारून बोलतात, नेमके तेच कळत नाही, असे शरद कोळी यांनी म्हटले आहे.
शहाजीबापू हे त्यांच्याकडे बायकोला लुगडं घ्यायला पैसे नाहीत, असे सांगतात. एवढेच नव्हे तर हातभट्टीची दारु प्यायल्यानंतर शहाजी पाटील त्याचं बिलही दुसऱ्याला भरायला लावतात. ते शहाजीबापू उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना काय घर बांधून देणार, असा टोला लगावत, आमदार होण्यासाठी शहाजीबापू पाटील मातोश्रीसमोर जाऊन नाक घासत होते, याचा आता त्यांना विसर पडला आहे. शहाजी पाटील यांनी वायफळ बडबड बंद करा, अन्यथा तुमच्या घरावर शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असा इशारा देत शरद कोळी यांनी शहाजीबापू पाटील यांच्यावर सडकून टीका केली.
दरम्यान, पडायची प्रॅक्टिस महाराष्ट्रात माझ्याएवढी कुणाची आहे? सात आठवेळा धडाधडा पडलो होतो, असे शहाजीबापू पाटील यांनी म्हटले होते. तसेच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी सांगोल्यात येऊन लोकांची कामे करावी. त्यासाठी दोघांना बंगले भाड्याने घेऊन देतो, अशी टिप्पणी शहाजीबापू पाटील यांनी केली होती.