नवनीत राणा यांचे गंभीर आरोप, पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ट्वीट केला व्हिडिओ

0

मुंबई,दि.26: हनुमान चालीसावरुन वाद झाल्यानंतर कारवाई करुन अटकेत असलेले नवनीत राणा (navneet rana) यांनी पोलिसांवर गंभीर आरोप करत लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार केली होती. तक्रारीत नवनीत राणा यांनी आपण मागासवर्गीय असल्याने आपणास प्यायलाही पानी दिले नाही असे अनेक गंभीर आरोप केले होते. यादरम्यान मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी राणा दांपत्याचा पोलीस ठाण्यातील एक व्हिडीओ ट्वीट करत आरोप करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे.

राणा दांपत्याचा व्हिडीओ मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ट्वीट केला असून यामध्ये खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा पोलीस ठाण्यात बसून चहा पित असल्याचं दिसत आहे. नवनीत राणा यांनी एकीकडे पोलिसांनी पाणीदेखील दिलं नसल्याचा आरोप केला असताना संजय पांडे यांनी या व्हिडीओतून त्यांचे सर्व आरोप खोडून काढले आहेत.

संजय पांडे यांनी व्हिडीओ ट्वीट करताना आम्हाला अजून काही बोलायची गरज आहे का? अशी विचारणा केली आहे.

नवनीत राणा यांचे पत्रात आरोप

“पोलिसांनी मला २३ तारखेला अटक केली. रात्रभर खार पोलीस स्टेशनमध्ये ठेवलं. त्यावेळी मी अनेक वेळा पिण्यासाठी पाणी मागितलं. तरी मला रात्रभर पाणी दिलं नाही. मला धक्का तर तेव्हा बसला जेव्हा मला पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी मी अनुसुचित जातीची असल्याने त्यांच्या भांड्यात पाणी मिळणार नाही असं सांगितलं. हा सरसरळ माझा जातीवरुन केलेला अपमान आहे,” असा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे.

“मला रात्रभर बाथरुमही वापरु दिलं नाही. अत्यंत खालच्या दर्जाच्या भाषेत मला शिवीगाळ केली गेली. अनुसुचित जातीच्या लोकांना आम्ही आमचं बाथरुम वापरु देत नाही असंही सांगितलं,” असा दावा नवनीत राणा यांनी केला आहे.

यांच्या अटकेप्रकरणी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राज्य सरकारकडून सविस्तर माहिती मागवली आहे. ओम बिर्ला यांनी २४ तासात ही माहिती सोपवण्यास सांगितलं आहे. नवनीत राणा यांनी मुंबई पोलिसांकडून अमानवीय वागणूक दिली जात असल्याची तक्रार करणारं पत्र लिहिल्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी ही माहिती मागवली आहे. इंडियन एक्स्प्रेसने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, गृहमंत्रालयाच्या मार्फत ही माहिती मागवण्यात आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here