मुंबई,दि.13: सुषमा अंधारेंच्या (Sushma Andhare) विभक्त पतीने गंभीर आरोप केले आहेत. सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे अडसरकर हे एकनाथ शिंदे गटात (Eknath Shinde Group) प्रवेश करत आहेत. मागच्या चार महिन्यांपूर्वी शिवसेनेत दोन गट पडल्याने ठाकरे गट आणि शिंदे गटात इनकमिंग आऊटगोईंग असल्याचे दिसत आहे. दरम्यान मागच्या काही महिन्यांपूर्वी ठाकरे गटात प्रवेश केलेल्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटातील नेत्यांचा चांगलाच समाचार घेतल्याने त्या राज्याच्या कानाकोपऱ्यात अल्पावधित फेमस झाल्या. या सगळ्या घडामोडीत शिंदे गटाकडून सुषमा अंधारे यांच्यावर एक नवी चाल खेळण्यात येत आहे. सुषमा अंधारे यांचे पतीच आता बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. याबाबत सुषमा अंधारे यांचे पती वाघमारे यांनी सुषमा अंधारे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
सुषमा अंधारे यांच्यापासून विभक्त झालेले पती वैजनाथ वाघमारे अडसरकर यांच्या सोबत, अभिनेत्री दिपाली सय्यद यांचाही आज (दि.13) शिंदे गटात प्रवेश होणार आहे. वाघमारे यांना प्रवेश देऊन शिंदे गटाने सुषमा अंधारे यांची डोकेदुखी वाढवल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान वाघमारे यांनी माध्यामांना प्रतिक्रिया दिली यावेळी वाघमारे यांनी सुषमा अंधारे यांच्यावर सडकून टीका करत त्यांच्यावर गंभीर आरोपही केले. वाघमारे म्हणाले की, मी आज शिंदे गटात प्रवेश करणार आहे त्यानंतर सुषमा अंधारे या बोगस असल्याचे पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार असल्याचे ते म्हणाले.
मुळात सुषमा अंधारे यांनी वकीलीची डिग्री बोगस असल्याचा पहिला आरोप वाघमारे यांनी लगावला. सुषमा अंधारे यांची काय पोहोच आहे त्या काय बोलतात याची मला सगळी पाळेमुळे माहिती आहेत. याबाबत लवकरच पत्रकार परीषद घेवून सुषमा अंधारे यांचा भांडाफोड करणार आहे. सुषमा अंधारे यांचे शैक्षणिक कागदपत्रे त्यांनी कुठून आणले आहेत हे दाखवावे असे ही वाघमारे म्हणाले.
सुषमा अंधारे यांचे प्रत्युत्तर
सुषमा अंधारे म्हणाल्या, की ‘माझे पती आणि मी गेली 5- सहा वर्षे विभक्त आहोत. शिंदे गटातील प्रवेश हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे. माध्यमांनी ही बातमी फार महत्वाची मानू नये.’ लवकरच पत्रकार परिषद घेत सुषमा अंधारे काय आहे याचा खुलासा करणार आहे, असं वैजनाथ वाघमारे म्हणाले होते. यावरही सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, की ‘त्यांच्याकडे काय गुपित आहे माहिती नाही. पण मी तयार आहे.’
सुषमा अंधारे म्हणाल्या, की ‘मी कधीच म्हटले नाही की माझ्याकडे LLB ची डिग्री आहे. ते म्हणतात की त्यांनी मला घडवलं त्यावर मला काहीच बोलायचे नाही. त्यांना तो आनंद घेऊ द्या. मी माझ्या मुलीचे नाव पण कबिरा सुषमा अंधारे असं लावते, यातच सर्व काही आलं. पब्लिक लाईफमधे त्यांचा आणि माझा एकत्र फोटो दाखवावा’
पुढे वाघमारे म्हणाले, वैजनाथ वाघमारे यांनी सांगितलं की ‘आम्ही दोघं अनेक वर्षांपासून विभक्त राहातो. आमचा काहीही संबंध नाही. एकनाथ शिंदेंची भूमिका पटली म्हणून मी त्यांच्या पक्षात प्रवेश करत आहे. एकनाथ शिंदेंसोबत चर्चा केली आहे. त्यांच्यासमोर काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी हो म्हटलं आणि आज प्रवेश करत आहे, अशी माहिती वाघमारे यांनी दिली आहे. पक्ष जी जबाबदारी देईल ती आपण पार पाडेल, असंही ते म्हणाले.
सुषमा अंधारेंना रोखण्यासाठी शिंदे गटाची नवी चाल
शिवसेनेच्या उपनेत्या (ठाकरे गट) सुषमा अंधारे यांना शह देण्यासाठी शिंदे गटाकडून एक नवा डाव टाकण्यात आला आहे. सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे अडसरकर हे रविवारी ठाण्यातील एका कार्यक्रमात शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.