वाशिम,दि.२९: बीडमधील हिंसाचारावरून आमदार रोहित पवार यांनी खळबळजनक दावा केला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाला बीडमध्ये हिंसक वळण लागले होते. बीडमधील हिंसाचारात आमदारांची घरे, कार्यालये पेटवण्यात आली. आता या घटनेवरून आमदार रोहित पवार यांनी खळबळजनक दावा केला आहे. बीडच्या जाळपोळ, तोडफोडीमागे एका शक्तीशाली व्यक्तीचा हात होता असं रोहित पवारांनी वाशिम येथे संघर्ष यात्रेवेळी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
आमदार रोहित पवार म्हणाले की, मी बीडला स्वत:गेलो होतो. या घटनेमागे एका शक्तीशाली व्यक्तीचा हात होता. सत्तेत असणाऱ्या व्यक्तीचा हात होता. हिंसक आंदोलनावेळी जवळपास ७ तास पोलीस शांत बसले होते. सत्तेतला व्यक्ती आदेश देतो तेव्हा पोलीस शांत बसतात. अशावेळी तिथे जाळपोळ करत मराठा-ओबीसी समाजात वातावरण गढूळ करण्यासाठी तिथे जाळपोळ झाली.त्यामुळे बीडमध्ये जे काही घडले. त्यात लोकसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन राजकीय द्वेषातून हे घडले असं त्यांनी म्हटलं.
त्याचसोबत जानेवारी महिन्यापासून राज्यातील विविध जिल्ह्यात अशाप्रकारे वातावरण गढूळ केले जाऊ शकते. त्यामुळे सर्व ग्रामस्थ, शहरातील लोकांना माझी विनंती आहे की महाराष्ट्र शांत ठेवणे हे सर्वसामान्यांच्या हिताचे आहे.राजकीय द्वेषातून प्रोफेशनल गुंड आणून कुणी जाळपोळ करत असेल हे समजून घेतले पाहिजे असं आवाहन आमदार रोहित पवार यांनी राज्यातील जनतेला करत सरकारवर मोठा आरोप केला आहे.