शिंदे गटाच्या महिला नेत्या मीनाक्षी शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांचा उल्लेख करत खळबळजनक दावा

0

ठाणे,दि.६: शिंदे गटाच्या महिला नेत्या मीनाक्षी शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख करत खळबळजनक दावा केला आहे. ठाण्यात ठाकरे गटाची महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांना सोमवारी (३ मार्च) शिंदे गटाच्या महिलांनी मारहाण केली. यानंतर रोशनी शिंदेंवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. यावरून मोठ्या प्रमाणात राजकीय पडसाद गदारोळ सुरू आहे. अशातच शिवसेना (शिंदे गट) नेत्या, माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी रोशनी शिंदेंना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. ठाकरे गटावर आरोप करत, राजकारणासाठी रोशनी शिंदेंचा नाहक बळी जाऊ नये, असे मीनाक्षी शिंदेंनी म्हटले आहे.

‘टीव्ही ९ मराठी’शी संवाद साधताना मीनाक्षी शिंदेंनी दिवंगत आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत खळबळजनक दावाही केला आहे. “आनंद दिघेंवर रुग्णालयात उपचार सुरू होते. तेव्हा उद्धव ठाकरे रुग्णालयात येऊन गेल्यानंतर अर्ध्या तासात आनंद दिघेंना मृत घोषित करण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत ठाणेकरांच्या मनात संभ्रमाचे वातावरण आहे. राजकारणाची पातळी घसरत चालली आहे. त्यात रोशनी शिंदेंचा नाहक बळी जाऊ नये,” असे मीनाक्षी शिंदे म्हणाल्या.

हे का चालले आहे, याचे गूढ अद्यापही उलगडले नाही: शिंदे गटाच्या महिला नेत्या मीनाक्षी शिंदे 

“रोशनी शिंदेंची प्रकृती ठीक असल्याचे दोन डॉक्टरांनी सांगितले आहे. मात्र, तरीही रोशनी शिंदेंना सातत्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला जातोय, गंभीर भासवले जात आहे. गर्भवती नसताना, आहे म्हणून सांगितले जाते. त्यांना बोलता येत नसल्याचे सांगितले जात आहे. हे का चालले आहे, याचे गूढ अद्यापही उलगडले नाही. एकीकडे आजारपण दाखवले जात असताना, उद्या एखाद्या डॉक्टरांनी तिला इंजेक्शन देऊन मारले, तर आम्हाला कळणारसुद्धा नाही. म्हणून आम्ही पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे,” असे मीनाक्षी शिंदेंनी म्हटले आहे.

रुग्णालयात रोशनी शिंदेंवर उपचार

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याचा आरोप करत शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी सोमवारी रात्री रोशनी शिंदेंना मारहाण केली. त्यानंतर रोशनी शिंदेंना ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर बुधवारी रोशनी शिंदेंना लीलावती रुग्णालयात दाखल केले आहे. रोशनी शिंदेंना काहीही झालेले नाही, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here