विनायक मेटे अपघात प्रकरण; विनायक मेटे यांच्या भाच्याचा खळबळजनक दावा

0

दि.१८: १४ ऑगस्टला शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं. त्यांच्या निधनानंतर एकीकडे राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त होत असताना दुसरीकडे घातपाताचा संशय देखील व्यक्त केला जात होता. विशेषत: विनायक मेटेंचा अपघात झाल्यानंतर जवळपास तासभर तिथे मदत पोहोचली नाही, असा देखील दावा केला जात होता. विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाची पोलीस चौकशी सुरु असताना आता त्यांच्या भाच्याने केलेल्या दाव्यामुळे पुन्हा एकदा या अपघातासंदर्भात नव्याने प्रश्नचिन्हं निर्माण झाली आहेत.

विनायक मेटेंचे भाचे बाळासाहेब चव्हाण यांनी अपघाग्रस्त गाडीमध्ये विनायक मेटे नव्हतेच असा दावा केला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर विनायक मेटेंच्या गाडीला अपघात झाल्याने रविवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणामध्ये पोलीस अपघात की घातपात या दिशेने तपास करत असतानाच आता हा दावा समोर आल्याने प्रकरणाला आणखीन एक वळण मिळालं आहे.

“विनायक मेटे यांनी जागी प्राण सोडला आहे. हे समजल्यानंतर मी ड्रायव्हर एकनाथ कदमला फोन केला होता. त्याने सांगितले की साहेब बरे आहेत, साहेबांना काही झाले नाही, मी २० मिनिटे साहेबांसोबत बोलतोय, ते व्यवस्थित आहेत, अशी माहिती ड्रायव्हर एकनाथ कदम यांनी दिली. मात्र, मी विनायक मेटे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी फोन उचलला नाही, त्यामुळे ड्रायव्हर एकनाथ कदमने दिलेल्या त्या माहितीचा नेमका काय अर्थ घ्यायचा?” असा सवाल बाळासाहेब चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमधून उपस्थित केला आहे.

अपघाताच्या दिवशी नेमकं काय घडलं याबद्दलही बाळासाहेब चव्हाण यांनी पत्रकार परिषदे माहिती दिली. मागील १२ वर्षांपासून हा चालक त्यांच्यासोबत काम करत होता. १३ ऑगस्ट रोजी वाहनाच्या अती वेगासाठी चलान झालं होतं. दुसऱ्या दिवशी पहाटे मला शिवसंग्रामचे पदाधिकारी तुषार काकडेंचा फोन आला. साडेपाचच्या सुमारास आलेल्या या फोन कॉलवर त्यांनी मला मेटेंच्या गाडीचा अपघात झाल्याचं सांगितलं आणि आपल्याला तातडीने निघावं लागेल असंही ते म्हणाले. त्यानंतर मी मेटेंचे खासगी सचिव विनोद काकडेंना फोन करुन वाहन चालक कोण होता वगैरे यांची माहिती घेऊन त्यांच्याशी संपर्क साधला,” असं चव्हाण म्हणाले.

“मेटेंसोबत एकनाथ कदम असल्याचं समल्यानंतर मी त्याला फोन करुन विचारणा केली असता त्याने सुरुवातीला मला ओळखलं नाही. त्याला मी अपघाताचे नेमके ठिकाण कोणते आहे हे समजण्यासाठी मोबाईलवरुन पाठवण्यास सांगितलं असता त्याने ते ही पाठवलं नाही. तो सारखा रडत होता. मात्र मी लोकेशन विचारलं असता तो उत्तरास टाळाटाळ करत होता. मी दुसऱ्या क्रमांकावरुन फोन केला असता त्याने मला आवाजावरुन ओळखलं,” असंही बाळासाहेब चव्हाण म्हणाले.

“मी त्याच्याकडे मदतीसंदर्भात विचारणा केली. तसेच मेटे यांची प्रकृती कशी आहे याची विचारणा केली असता त्याने, साहेबांना एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आल्याचं सांगितलं. तसेच त्यांच्या केवळ डोक्याला व पायाला मार लागल्याचेही त्याने सांगितलं. अपघातानंतर जवळ जवळ २० मिनिटं मी त्याच्याशी बोलत होतो, असंही तो मला म्हणाला. अखेर त्याने दुसऱ्या व्यक्तीकडे फोन दिला. त्यानंतर त्या व्यक्तीने मला नेमका अपघात कुठे झाला याची माहिती दिली,” असं बाळासाहेब चव्हाण म्हणाले. त्याचप्रमाणे, “दुसऱ्या व्यक्तीने मेटे यांचा जागीच मृत्यू झाल्याचेही सांगितले. त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांच्यासोबत असणारा पोलीस कर्मचारी बेशुद्धावस्थेत असल्याचीही माहिती त्या व्यक्तीने दिली. तसेच चालकाला इजा झाली नसल्याचंही ते म्हणाले,” असंही चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

“टोलनाक्यापासून २० ते २५ मिनिटांच्या अंतरावर मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला. महामार्गावरील सीटीटीव्ही फुटेजमध्ये ते गाडीत असल्याचे दिसत नव्हते. गाडीमध्ये पुढील बाजूला मेटे यांचा सुरक्षारक्षक दिसत असून ड्रायव्हर मोबाईलवर कोणाशी तरी बोलताना सीसीटीव्हीत दिसत आहे. त्यामुळे हा अपघात घडला की घडवून आणला याची चौकशी झाली पाहिजे. चालक एकनाथ कदम हा सातत्याने त्याचे जबाब बदलत असून यासंदर्भात सखोल चौकशी करणे आवश्यक आहे,” असं बाळासाहेब चव्हाण यांनी म्हटलं आहे. एकनाथ कदम सातत्याने जबाब बदलत असल्याने कुटुंबियांच्या मनात हा अपघात आहे की घातपात याबद्दल संशय असल्याचं सांगत चव्हाण यांनी या प्रकरणाची सरकारने सखोल चौकशी करावी अशी मागणी केल आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here