आम आदमी पार्टीच्या नेत्याचे उध्दव ठाकरेंचा उल्लेख करत मोठे वक्तव्य 

0

मुंबई,दि.12: आम आदमी पार्टीच्या नेत्याने उध्दव ठाकरेंचा उल्लेख करत मोठे वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होत आहेत. महाविकास आघाडीने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केला नाही. राज्यात निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रचार सभांना तुफान गर्दी होत असून झंझावात सुरू आहे. उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रात वाढता प्रतिसाद पाहता आता आम आदमी पार्टीच्या एका बड्या नेत्याने मोठे विधान केले आहे. महाराष्ट्रात हरयाणासारखी घटना टाळायची असेल तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करा, असे विधान ‘आप’च्या नेत्याने केले आहे. ‘आप’चे नेते संजय सिंह यांनी ही मागणी केली असून त्यामागची भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली आहे.

आम आदमी पार्टीचे नेते, राज्यसभेचे खासदार संजय सिंह यांनी हरयाणा विधानसभा निवडणुकीत जे गैरप्रकार घडले त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात टाळायची असेल तर महाविकास आघाडीने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित करावे, अशी मागणी केली आहे. संजय सिंह यांच्या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. संजय सिंह यांनी ‘एबीपी माझा’ला मुलाखत दिली. तसेच हे आपले वैयक्तिक मत असल्याचेही ते म्हणाले.

मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नंतर जाहीर केला तर एकमेकांचे आमदार महाविकास आघाडीत फूट पाडू शकतात, हरयाणामध्येही असेच झाले. काँग्रेसचे गट एकमेकांना पाडायला निघाले होते. त्यात काँग्रेसचे नुकसान झाले. त्यामुळे महाविकास आघाडीने नंबरच्या खेळात अडकू नये. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये जबरदस्त काम केले आहे. मराठी माणूस, मराठी स्वाभिमान या गोष्टीसुद्धा त्यांच्यासोबत जोडल्या जातात. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनवलं तर महाविकास आघाडीचा फायदा होईल, हे माझं वैयक्तिक मत आहे. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा केलं तर मतांची फोडाफोडी कमी होऊ शकते, असे संजय सिंह यांनी म्हणाले. दैनिक सामनाने याबाबत वृत्त दिले आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here