Sanjay Raut: याचा परिणाम फार वेगळा होईल, आम्हाला यात गांभीर्याने लक्ष घालावं लागेल: संजय राऊत

Sanjay Raut News: माझी लढाई व्यक्तिगत नव्हती, महाराष्ट्रासाठी होती

0

मुंबई,दि.२९: Sanjay Raut: याचा परिणाम फार वेगळा होईल, आम्हाला यात गांभीर्याने लक्ष घालावं लागेल असा इशारा महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादावरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बो यांनी महाराष्ट्रातील जत तालुक्यातील 40 गावं कर्नाटकात विलीन होणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर बसवराज बोम्मई यांनी सोलापूर व अक्कलकोटवर दावा सांगितला होता.

त्यामुळे यावरून महाराष्ट्रात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राज्यातलं विद्यमान सरकार यावर कोणतंही पाऊल उचलत नसल्याची टीका विरोधकांनी सुरू केली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात आज माध्यमांशी बोलताना शिंदे सरकारवर परखड शब्दांत टीकास्र सोडलं.

याचा परिणाम फार वेगळा होईल

“२०१८ साली मी केलेल्या भाषणासंदर्भात माझ्याविरोधात गुन्हे दाखल केले जातात आणि आत्ता वॉरंट पाठवतात. यावरही सरकारने भूमिका स्पष्ट केली पाहिजे. माझी लढाई व्यक्तिगत नव्हती, महाराष्ट्रासाठी होती. आता तर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रावरचे हल्ले वाढले आहेत. याचा परिणाम फार वेगळा होईल. आम्हाला यात गांभीर्याने लक्ष घालावं लागेल”, असा इशाराही संजय राऊतांनी यावेळी दिला.

महाराष्ट्र सरकारमधल्या काही लोकांचा छुपा पाठिंबा

जत तालुक्यातील उमराडी गावात कन्नड वेदिका संघटनेच्या काही लोकांनी झेंडे फडकवल्याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता संजय राऊतांनी त्यासाठी शिंदे सरकारला जबाबदार धरलं. “याविषयी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना काय वाटतं हे त्यांना विचारायला हवं. ज्या दोन मंत्र्यांना सीमाभागासंदर्भातलं काम दिलंय ते चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई हे तीन तारखेला बेळगावला चालल्याचं मी वाचलं. कन्नड वेदिकेचे लोक महाराष्ट्रात येतात, हे कर्नाटक सरकारच्या पाठिंब्याशिवाय येऊ शकत नाहीत. ते आपले झेंडे लावतात हे महाराष्ट्र सरकारमधल्या काही लोकांचा छुपा पाठिंबा असल्याशिवाय होऊ शकत नाही. हे असं घडलं असेल, तर राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ताबडतोब त्यावर सरकारची भूमिका स्पष्ट केली पाहिजे”, असं संजय राऊत म्हणाले.

“तुम्ही पुन्हा गुळमुळीत धोरण स्वीकारून हात चोळत बसणार आहात, दिल्लीकडे बघत बसणार आहात की त्या गावातून झेंडे लावायला घुसलेल्या लोकांना घालवण्यासाठी पुन्हा आसामला जाऊन नवस करणार आहात हे एकदा सांगा”, अशा शब्दांत संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला.

राजद्रोहाचे गुन्हे दाखल करा

“ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. राज्याच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात अशा प्रकारे कुणी धाडस केलं नव्हतं. पण एक दुबळं, विकलांग, मानसिकदृष्ट्या अपंग सरकार राज्यात बसलंय. त्यांना पाठीचा कणा नाही, स्वाभिमान नाही. महाराष्ट्राचा अभिमान नाही. अशा सरकारकडून या राज्याचं रक्षण होईल असं आम्हाला वाटत नाही. जसं काश्मीरमध्ये येऊन परकीय शक्तींनी झेंडे फडकवावेत, त्या पद्धतीने हे लोक महाराष्ट्रात घुसलेत. त्या सगळ्यांवर राजद्रोहाचे गुन्हे दाखल केले जावेत”, अशी मागणी संजय राऊतांनी केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here