मुंबई,दि.22: एकनाथ शिंदेंचा उल्लेख करत संजय राऊत यांनी गौप्यस्फोट केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीचं सरकार असताना भाजपा नेत्यांना अटक करण्याचा डाव आखण्यात आला होता असा गंभीर आरोप केला आहे. एकनाथ शिंदेंच्या आरोपाला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय जनता पक्ष ईडी आणि सीबीआय मागे लावून एकनाथ शिंदेंना तुरुंगात टाकणार होतं, असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला.
एकनाथ शिंदे अटक टाळण्यासाठी कुठे कुठे जाऊन रडले हे त्यांनी सांगावं असं संजय राऊत म्हणाले आहेत. स्वत: एकनाथ शिंदे तुरूंगाला घाबरून पळाले, असा दावाही संजय राऊत यांनी केला. भाजपमध्ये एकतर भ्रष्टाचाऱ्यांना स्थान आहे किंवा खोटं बोलणाऱ्यांना जागा आहे. असे टीकास्त्र संजय राऊत यांनी सोडलं.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
“महाविकास आघाडी सरकार 2022 मध्ये सरकार कोसळण्याआधी आशिष शेलार, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर आणि देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याची योजना होती. एखाद्या प्रकरणात गुंतवून त्यांना अटक करण्याचा डाव होता. तसंच 2024 च्या निवडणुकीसाठी आमदार फोडण्याची योजना आखण्यात आली होती,” असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
संजय राऊत काय म्हणाले?
भाजपात एखादा व्यक्ती गेला की त्याला खोटं बोलण्याचं प्रशिक्षण रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठानमध्ये दिलं जातं. तुम्ही कसं खोटं बोललं पाहिजे, आरोप केले पाहिजेत याचं प्रशिक्षण देतात. त्यानुसार एकनाथ शिंदे, अजित पवार रेटून खोटं बोलत आहेत. आज जरी जेलवारी टळली असली तरी उद्या टळणार नाही हा आमचा इशारा आहे,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.