किरीट सोमय्या यांना संजय राऊत यांचे पत्र,भ्रष्टाचाराचे दिले पुरावे

0

मुंबई,दि.२१: भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे महाविकास आघाडीला सातत्याने लक्ष्य करत असताना व अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचा ‘ स्कॅम क्रूसेडर ‘ असा उल्लेख करत शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी एक पत्रच सोमय्या यांना धाडलं आहे. भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पातील घोटाळ्याकडे या पत्राच्या माध्यमातून सोमय्या यांचे लक्ष वेधून ईडीपर्यंत हे प्रकरण पोहचवण्याची विनंती राऊत यांनी केली आहे. घोटाळ्याच्या फाइलचा अभ्यास करून तुम्ही लवकरच मोठा गौप्यस्फोट कराल अशी अपेक्षा आहे, असेही राऊत यांनी पुढे पत्रात नमूद केले आहे. राऊत यांच्या या पत्राची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

किरीट सोमय्या हे सातत्याने महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य करत आहेत. सरकारमधील अनेक मंत्र्यांवर व अन्य नेत्यांवर त्यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन काहींची सक्तवसुली संचालनालय व इतर केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशीही सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांचं पिंपरी चिंचवडमधील घोटाळ्याकडे लक्ष वेधलं आहे.

संजय राऊत यांनी सोमय्या यांना लिहिलेल्या पत्रात पिंपरी चिंचवड पालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात ५०० ते ७०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा केला आहे. पिंपरी चिंचवड दौऱ्यात सुलभा उबाळे आणि इतर प्रमुख नेत्यांनी माझ्याकडे या घोटाळ्याशी संबंधित कागदपत्रे सोपवली. २०१८-१९ या आर्थिक वर्षात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शेकडो कोटींच्या निविदा काढण्यात आल्या. या निविदा सदोष होत्या. यात क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि आर्कुस या दोन कंत्राटदारांना ५०० कोटीपेक्षा अधिकची कंत्राटे देण्यात आली. मात्र, कामांसाठी ठरवून दिलेली मुदत संपूनही ५० टक्के कामेही या कंत्राटदारांनी पूर्ण केली नाहीत. दोन कंपन्यांच्या हितासाठी हे सगळं करण्यात आलं आणि सरकार व जनतेचा पैसा या कंत्राटदारांच्या घशात घालण्यात आला.

या संपूर्ण प्रकल्पातच मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असून आपण अनेक घोटाळे बाहेर काढले असल्याने मी तुमचे या घोटाळ्याकडे लक्ष वेधत आहे, असे राऊत यांनी पत्रात नमूद केले आहे. या घोटाळ्याचे पुरावे असलेली संपूर्ण फाइल मी तुमच्याकडे सोपवत आहे, असे नमूद करताना त्याचे कारणही राऊत यांनी पुढे नमूद केले आहे.

आपण जी प्रकरणे ईडीच्या निदर्शनास आणून दिली त्या बहुतेक प्रत्येक प्रकरणात ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. ही बाब ध्यानात घेऊन पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्प घोटाळ्याची फाइल ईडी किंवा इतर कोणत्याही तपास यंत्रणेकडे न देता थेट मी तुमच्याकडे पाठवत आहे. याप्रकरणाची तुम्ही चौकशी कराल आणि त्यात काही तथ्य आढळल्यास पुढील चौकशीसाठी फाइल ईडीकडे सोपवाल, अशी अपेक्षा आहे. त्यातही घोटाळ्याचा आरोप खोटा आहे असे तुम्हाला वाटले तर तुम्ही घोटाळ्यात जे कुणी सहभागी असतील त्यांना जाहीरपणे क्लीन चिट देऊन टाका, असा खोचक सल्लाही राऊत यांनी दिला आहे. पिंपरी चिंचवडमधील क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा घोटाळा खूप मोठा असून जनहितार्थ बाब म्हणून आपण हा घोटाळा सर्वांसमोर आणावा, अशी आपणास विनंती असल्याचेही राऊत यांनी पुढे नमूद केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here