मुंबई,दि.28: शिवसेना (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत खळबळजनक दावा केला आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी हेच भाजपाचे पंतप्रधानपदाचे दावेदार व उमेदवार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोनदा पंतप्रधान झाले आहेत. अमित शाह यांना पंतप्रधान व्हायचं असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. पंतप्रधान पदासाठी शर्यतीत अमित शाह आहेत. पण सध्या पतंप्रधान नरेंद्र मोदी आहेत, सत्तेचा सारीपाट तुमच्या इशारावर चालणार नाही, असे राऊत म्हणाले.
अमित शाह यांनी काँग्रेस आणि ठाकरे गटावर घराणेशाहीवरून टीका केली होती. याला राऊत यांनी उत्तर दिले आहे. अमित शाह यांचा मुलगा जय शाह हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव आहेत. खरी घराणेशाही तर भाजपामध्येच आहे. जय शाह यांनी विराट कोहलीपेक्षा जास्त षटकार मारले होते का?, जय शाह यांनी सचिनपेक्षा जास्त शतक ठोकले होते का?, जय शाह यांनी कपिल देवपेक्षा जास्त क्रिकेट खेळलं आहे का, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.

देशातील काही घरांना प्रतिष्ठा आहे त्यातील एक ठाकरे घराण्याला, या देशात शरद पवारांच्या घराण्याला देखील प्रतिष्ठा आहे. या घराण्यांचे लाभार्थी नरेंद्र मोदी आणि अमित शहा सुद्धा आहेत हे त्यांनी आपल्या मनाला विचाराव, बाळासाहेब ठाकरे यांच्या घराण्याचा वारसा हिंदुत्वाचा आहे त्याचाही लाभ भारतीय जनता पक्षाने वारंवार घेतलेला आहे, बाळासाहेब ठाकरे जर नसते तर भारतीय जनता पार्टी राज्यात औषधालाही दिसला नसता, बाळासाहेबांचा आणि त्यांच्या घराण्याचं बोट धरून राज्यात भाजप पक्ष वाढलेला आहे, असे ते म्हणाले.