मुंबई,दि.24: Sanjay Raut On Eknath Shinde: शिवसेना नेते संजय राऊतांनी (Sanjay Raut) शरद पवारांसोबतच्या (Sharad Pawar) बैठकीनंतर एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) आव्हान दिलं आहे. आता वेळ निघून गेली आहे. जर रस्त्यावर लढाऊ झाली तर तिथेही आम्हीच जिंकू अशा शब्दात शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना जाहीर आव्हान दिलं आहे. मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित होते. या बैठकीनंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तुम्ही या, आमची पूर्ण तयारी आहे असं आव्हान दिलं.
“फक्त कायदेशीर मार्ग नाही तर सर्व प्रकारचे मार्ग अवलंबणार आहोत. यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या साक्षीनं आम्ही हार मानणार नाही असं सांगतो. आम्ही सभागृहात जिंकू, जर रस्त्यावर लढाई झाली तर तिथेही जिंकू. ज्यांना आमचा सामना करायचा आहे ते मुंबईत येऊ शकतात,” असं संजय राऊत म्हणाले.
“यांनी चुकीचं पाऊल उचललं आहे. त्यांना आम्ही परत येण्याची संधीदेखील दिली. पण आता वेळ निघून गेली आहे. आत्ताच आमची शरद पवारांसोबत चर्चा झाली. अनिल देसाई, दिलीप वळसे पाटीलदेखील उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांशीही चर्चा झाली आहे,” अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
“तुम्ही या, आमची पूर्ण तयारी आहे. आता आमचं आव्हान आहे,” असं संजय राऊत म्हणाले आहेत. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “याच इमारतीमधून महायुतीची घोषणा झाली होती. येथूनच महायुतीचं बंधन बांधण्यात आलं. याच इमारतीमधून मी तुम्हाला महाविकास आघाडी मजबूत असून पुढील अडीच वर्ष पूर्ण करुन पुन्हा सत्तेत येईल असं सांगतो”.
दिलीप वळसे पाटील यांना का बोलावण्यात आलं होतं? असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आहेत. ते अनुभवी नेते असून विधानसभा अध्यक्षही राहिले आहेत. त्यांच्यात आणि अनिल देसाई यांच्यात कायदेशीर लढाईसंबंधी चर्चा झाली. जे आम्हाला करायचं आहे ते आम्ही केलं आहे”.
“शरद पवार देशाच्या राजकारणातील सर्वात मोठे नेते आहेत. मी त्यांना भिष्म पितामह म्हणतो. शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये नेहमी चर्चा होत असते,” असं संजय राऊतांनी सांगितलं. तसंच अल्टिमेटमचा वेळ संपला असल्याचंही म्हटलं.