मुंबई,दि.२५: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरन्यायाधीश सुर्यकांत यांचा गणेश मुर्ती देऊन सत्कार केला. याचा फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी देखील फोटो शेअर केला आहे. सर्वोच्च न्यायालयात मागील साडेतीन वर्षांपासून शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष कोणाचा याबाबत सुनावणी सुरु आहे. अशातच काल विमानतळावर एकनाथ शिंदे यांनी सरन्यायाधीश सुर्यकांत यांचे स्वागत केले होते.
सरन्यायाधीश आणि शिंदे यांचा फोटो शेअर करत संजय राऊत यांनी म्हणून तीन वर्ष तारीख पे तारीख अशी कॅप्शन दिली होती. हा फोटो समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. आता परत राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सरन्यायाधीश यांचा सत्कार केलेला फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत संजय राऊत यांनी ट्विट केले आहे की धनुष्य बाण आणि घड्याळाचा निकाल लागला…
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष प्रकरणात पक्षकार असणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सरन्यायाधीश सूर्य कांत यांचा सत्कार करण्यात आला. ज्यांच्यापुढे खटल्याची सुनावणी सुरू आहे त्यांचा सत्कार पक्षकारांनी केल्यामुळे सांगा, न्याय कसा मिळेल, अशी चर्चा समाजमाध्यमांत सुरू झाली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या सत्काराचा सोहळा आज मुंबईत आयोजित करण्यात आला होता. या सत्कार सोहळय़ाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विशेष उपस्थिती होती. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिले आहे, तर अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घडय़ाळ हे पक्ष चिन्ह दिले आहे. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांवरील सुनावणी सातत्याने पुढे ढकलली जात आहे. यामुळे ज्या सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यापुढे सुनावणी सुरू आहे त्यांच्या सत्कार सोहळय़ाला शिंदे आणि अजितदादा यांनी विशेष उपस्थिती लावल्याने चर्चा सुरू झाली आहे.
संजय राऊत यांनी फोटो केला शेअर
फोटो खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरुन ट्विट केला. पण त्यांच्या कॅप्शनने सर्वाधिक लक्ष वेधले आहे. कमी शब्दात राऊतांनी भविष्यातील घडामोडींवर भाष्य केले. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
“धनुष्य बाण आणि घड्याळाचा निकाल लागला!!!! न्यायदेवते त्यांना क्षमा कर! हे राम!” अशी कॅप्शन राऊत यांनी दिली आहे.








