मुंबई,दि.२१: शिवसेना (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेते महेश कोठारे (Mahesh Kothare) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. अभिनेता महेश कोठारे यांनी एका कार्यक्रमात भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून राऊत यांनी कोठारे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. लवकरच महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. महापौर आपल्याच पक्षाचा व्हावा, यासाठी शिवसेना ठाकरे आणि भाजपा यांच्यात राजकीय संघर्ष सुरू झाला आहे.
काय म्हणाले होते महेश कोठारे?
दिवाळी सणाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात अभिनेते महेश कोठारे (mahesh kothare) केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुंबईतील बोरिवलीत भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्याकडून दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी महेश कोठारे म्हणाले, “आगामी मुंबईचा महापौर भाजपचा आणि इथलाच असेल. तसेच, मी मोदीभक्त आहे, भाजप म्हणजे घरचा कार्यक्रम आहे, महापालिका निवडणुकीत मुंबईत नक्कीच कमळ फुलेल”
काय म्हणाले संजय राऊत?
“ते नक्की मराठी आहेत ना ते? मला शंका वाटत आहे. ते कोणत्याही पक्षाचे असूदेत. प्रत्येकाला मताचा अधिकार आहे. पण ते एक कलाकार आहेत. तुमचे सिनेमे फक्त भाजपाच्या लोकांनी पाहिलेले नाहीत. तात्या विंचू तुम्हाला चावेल. तात्या विंचू अस्सल मराठी माणूस होता. असं बोललात तर रात्री येऊन चावा घेईल, गळा दाबेल,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.








