नवी दिल्ली,दि.६: पाच राज्यांतील निवडणुकांचा कल समोर आला आहे. पाचपैकी तीन राज्यांत भाजपाने सत्ता मिळवली आहे. काँग्रेसला अवघ्या एका राज्यातच यश मिळालं. त्यामुळे आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात या विरोधकांच्या मागणीला जोर आलाय. याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी आज पुन्हा जोर दिला. तसंच, यावेळी त्यांनी किरीट सोमय्यांवरही टीका केली. आज ते दिल्लीत असून तेथे त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
संजय राऊत म्हणाले की, ईव्हीएमबाबत भाजपानेच शंका उपस्थित केली होती. काँग्रेस राजवटीच्या काळात हा मुद्दा सगळ्यात आधी सुब्रमण्यम स्वामी, किरीट सोमय्या यांनीच कोर्टात नेला होता. बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात याकरता याचिका केली होती. यावर शिवसेनेने आवाज उठवावा म्हणून सोमय्या प्रेझेंटन्शन घेऊन शिवसेना भवनात आले होते. डॉ.स्वामी आले होते. डॉ. स्वामींचं यावरचं पुस्तक वाचा.
तसंच, “उद्धव ठाकरे म्हणाले की शंकांचं निरसन करायचं असेल तर देशातील कोणतीही एक निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या. पोस्टल वोटिंग बॅलेट पेपरवर येतात. त्यामध्ये १९९ जागांवर काँग्रेस आघाडीवर होती. मग आमचा ईव्हीएमवर विश्वास कसा बसेल?” असा प्रश्नही राऊतांनी विचारला.