उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट होणार असल्याच्या चर्चेवर संजय राऊत म्हणाले…

0

मुंबई,दि.८: शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासंदर्भात चर्चा करण्याकरता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. या दोन्ही ठाकरे बंधूंच्या भेटीवरून राजकारणातून अनेक तर्क वितर्क लढवले जात असताना संजय राऊतांनी याबाबत सूचक प्रतिक्रिया दिली आहे. आज ते दिल्लीत प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले की, ते दोघे भाऊ आहेत. दोन भाऊ एकमेकांना कधीही भेटू शकतात, चर्चा करू शकतात. यामध्ये तिसऱ्या माणसाला पडण्याची गरज नाही. मी दोघांनाही ओळखतो, दोघांशीही माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. पण राजकीय विषय येतो, तेव्हा मी मनापासून माझे पूर्ण कुटूंब आणि सहकारी कायम बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार आहोत.

सर्वांत मोठा पराभव महाराष्ट्रात होईल

“मुळात एनडीए आहे का? आमच्यातून तुटलेला एक गट, एनसीपीएतून तुटलेला एक तुकडा आणि इतर गोळा केलेले ताकडे-तुकडे. मुळ एनडीए कुठे आहे? मूळ एनडीए म्हणजे शिवसेना, अकाली दल, जनता दल युनायडेट, डीएमके, तृणमूल काँग्रेस, या मुख्य पक्षांनी बनवलेला एनडीए होता. कालपर्यंत आपण ‘एक मोदी सबपर भारी’, आम्हाला कोणाची गरज नाही, असं म्हणत होते. मग आता तुम्हाला आम्ही इंडिया स्थापन केल्यावर एनडीएची गरज का भासतेय?” असा प्रश्नही संजय राऊतांनी विचारला.

“त्यांच्या पायाखालची वाळू सरकतेय, २०२४ च्या निवडणुकीत समोरे जाताना आत्मविश्वास राहिलेला नाही. त्यामुळे हा पक्ष तोडा, तो पक्ष तोडा आणि मग एनडीएचं शेपूट जोडा. ते महाराष्ट्र सदनात येणार असतील, पण एनडीएचा सर्वांत मोठा पराभव महाराष्ट्रातच होणार. इतिहासातील सर्वांत मोठा पराभव कुठे होणार असेल तर बिहार ,महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटक, पश्चिम बंगाल, केरळ, तेलंगणा या प्रमुख एनडीएचा पराभव होईल. त्यांनी महाराष्ट्र सदनात जास्तीत जास्त बैठका घ्यायला हव्यात”, असंही संजय राऊत म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here