Sanjay Raut: ईडीची पथकं फक्त महाविकास आघाडी पुरतीच मर्यादीत? : संजय राऊत

0

मुंबई,दि.23: Sanjay Raut: राष्ट्रवादीचे नेते राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांची सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) चौकशी सुरू आहे. महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांची ईडी चौकशी करण्यात आली आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्र सरकार आणि तपास यंत्रणेवर टीका केली आहे. “किरीट सोमय्या यांनी काही प्रकरणं ईडीकडे दिली आहेत. भाजपच्याच नेत्यांची, आज जे भाजपमध्ये मंत्री आहेत, त्यांची अनेक प्रकरणं. भ्रष्टाचाराविरोधात लढणारे महात्मा, त्याच्यासाठी हा शब्द चांगला आहे. कारण त्यांना मी काहीही बोललो तर वाटतं मी शिवी दिली.

हे जे महात्मा आहेत, त्यांनी ईडीकडे अनेकांची प्रकरणं दिली आहेत. त्यांना का समन्स दिलं गेलं नाही? त्यांच्या घरी ईडीचे अधिकारी का नाही पोहोचले? आता ही सगळी प्रकरणं आम्ही पुन्हा ईडीकडे घेऊन जाणार आहोत. तक्रार कशी करायची हे आम्हाला माहीत आहे. ज्या तक्रारी आधी केलेल्या आहेत, त्याचं पुढे काय झालं? का ईडीची पथकं फक्त महाविका आघाडी, तृणमूल काँग्रेस, अखिलेश यादवांचा पक्ष, लालू यादवांचा पक्ष यांच्यापुरतीच मर्यादीत आहेत?”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

केंद्रीय तपास यंत्रणांची पोलखोल आपण करत राहू, तसेच ईडीच्या अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचारही समोर आणू, त्यासाठी कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच, नवाब मलिक यांची 20 वर्षांनी का चौकशी केली जातेय? असा सवालही यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, “नवाब मलिक असतील किंवा आमच्यासारखे खूप लोक आहेत. जे सातत्यानं बोलत आहेत. असत्याचा पर्दाफाश करत आहेत. मुखवटे ओरबाडून काढत आहेत. सत्य बाहेर काढत आहेत. त्यांच्यामागे आता देशभरात ईडी, सीबीआय लावलं जात आहे. नवाब मलिक यांना आज सकाळी ईडीचे लोक घरी आले आणि घेऊन गेले. ठिक आहे. चौकशी होईल आम्ही वाट पाहतोय. नक्कीच संध्याकाळी ते घरी येतील. आताच माझं वरिष्ठ स्तरावर बोलणं झालं. महाराष्ट्राच्या एका कॅबिनेट मंत्र्याला केंद्रीय तपास यंत्रणा घरी येऊन घेऊन जातात. चौकशी होऊ शकते एखाद्या गोष्टीची. चौकशी पण कशी हे 20 वर्षांनी करत आहेत. 20 वर्षांपूर्वीचं प्रकरण, 25 वर्षांपूर्वीचं प्रकरण.”


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here