वर्तमानपत्रातील जाहिरातीवरून संजय राऊत यांची एकनाथ शिंदे यांच्यावर टीका

0

मुंबई,दि.१३: वर्तमानपत्रातील जाहिरातीवरून संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. राज्यातील अनेक वर्तमानपत्रात शिवसेनेतील शिंदे गटाने जाहिराती दिल्या आहेत.  या जाहिरातीमध्ये ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे अफाट प्रेम मिळते आहे जनतेचे’, असं शीर्षकामध्ये म्हटले आहे. या जाहिरातीवरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या जाहिरातीवर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. 

संजय राऊत यांची एकनाथ शिंदे यांच्यावर टीका

संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रामध्ये असे विनोद राजकारणात होतं आहेत. ही जाहिरात सरकारी आहे की खासगी   जाहिरात जर सरकारी असेल तर भाजपने उत्तर द्यायला हवं. १०५ आमदारांच्या पाठिंब्यावर हे सरकार उभ आहे, त्यांनी उत्तर द्यायला पहिजे. कोट्यवधी रुपये खर्च करुन एका सर्वेची जाहिरात देण्यात आली आहे. हा सर्व नक्की कुठे केला, हा सर्व महाराष्ट्रातील असेल असं वाटतं नाही. हा सर्वे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यातील असेल. सर्वे खरा की खोटा कोणाला आनंद घ्यायचा असेल त्यांनी घ्यावा, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. 

“महाराष्ट्रात असा सर्वे येऊच शकत नाही. स्वत:ला बाळासाहेब ठाकरे यांचा वारसदार म्हणणाऱ्यांनी या जाहिरातीत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आणि कुठेही एखादा उल्लेख नाही. म्हणजे ही शिवसेना नसून शहा मोदींची सेना असल्याचे सिद्ध झाले आहे, असंही संजय राऊत म्हणाले. सर्वेमध्ये काय आहे काय नाही याच उत्तर १०५ आमदार देतील. याचे उत्तर देवेंद्र फडणवीस देतील. कोट्यवधी रुपयांच्या जाहिरातीचा खर्च सरकारी तिजोरीतून झाला आहे की दोन हजारांच्या नोटा चलनात आणण्याचे काम केले, असा आरोपही राऊत यांनी केला. 

जाहिरात काय आहे?

आज राज्यातील अनेक वृतपत्रात शिवसेनेच्या शिंदे गटाने जाहिरात दिली आहे. या जाहिरातीला ‘राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’, असं म्हटलं आहे. या जाहिरातीत एका सर्वेचा अहवाल दिला आहे.  ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जोडीने महाराष्ट्रात केलेल्या लोककल्याणकारी प्रकल्पामुळे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात त्यांना अव्वल स्थान मिळाले आहे’,असं या जाहिरातीत म्हटले आहे. 

“मतदान सर्वेक्षणानुसार, भारतीय जनता पक्षाला ३०.२% आणि शिवसेनेला १६.२% जनतेने कौल दिला म्हणजेच महाराष्ट्रातील ४६.४% जनता भाजप आणि शिवसेनेच्या या युतीला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी इच्छुक असल्याचा दावा केला आहे. 

तर दुसरीकडे या जाहिरातीत मुख्यमंत्रीपदाचे सर्वेक्षणही दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रातील २६.१% जनतेला पुन्हा मुख्यमंत्रीपदी आणि देवेंद्र फडणवीस यांना २३.२ % जनतेला मुख्यमंत्रीपदावर पहायचे आहे, म्हणजेच महाराष्ट्रातील ४९.३ % जनतेने पुन्हा या जोडीला पसंती दर्शवली, असं यात म्हटले आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here