सोलापूर,दि.23: सोलापूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची रंगत वाढत असतानाच भाजपाचे मोहोळ तालुक्यातील नेते संजय क्षीरसागर यांनी शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला असून भाजपामध्ये जाणून बुजून अन्याय करण्यात आल्याचा आरोप संजय क्षीरसागर यांनी केला आहे.
24 एप्रिल रोजी मोहोळ येथे खासदार शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आपण आपला लोकसेवक परिवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश करत असल्याची माहिती संजय क्षीरसागर यांनी दिली.
याबाबत बोलताना संजय क्षिरसागर म्हणाले की, गेली 25 वर्ष मी भाजपमध्ये सक्रिय काम करीत आलो आहे. पंचायत समिती पासून जिल्हा परिषद ते विधानसभे पर्यंतच्या निवडणुका लढवल्या आहेत. भाजपसाठी कठीण काळात काम केले आहे. परंतु मागील काही वर्षापासून जिल्ह्यातील काही नेत्यांच्या दबावामुळे आपल्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
मला पक्षात अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. हे पाहता मी भाजपा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या पक्षात असताना जनतेला काही देऊ शकलो नाही याची खंत असून चार वेळा लोकसभेची उमेदवारी मागितली मात्र उमेदवारी मिळाली नसल्याचे दुःख असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.
24 एप्रील रोजी मोहोळ येथे राष्टवादीचे नेते शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मी पवार यांच्या सोबत जाणार असुन सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना जाहीर पांठीबाही देणार असल्याचे यावेळी क्षीरसागर यांनी सांगितले.