शिंदे गटाच्या आमदाराचे एकनाथ शिंदे यांच्यासंदर्भात धक्कादायक विधान

0

मुंबई,दि.११: शिंदे गटाचे आमदाराने एकनाथ शिंदे संदर्भात धक्कादायक विधान केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नक्षलवाद्यांच्या हातून एन्काऊंटर केला जाणार होता, असे धक्कादायक विधान शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तसेच, एकनाथ शिंदेंचे एन्काऊंटर घडवण्यात कुणाचा सहभाग होता? याबद्दल सूचक वक्तव्यही संजय गायकवाड यांनी केले आहे. दरम्यान, याबाबत संजय गायकवाड यांचा सर्व रोख आधीच्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांवर होता. त्यामुळे ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संजय गायकवाड यांनी बुधवारी मीडियाशी संवाद साधला आहे. यावेळी, “एकनाथ शिंदेंना दुसरं काही देणार नव्हते, त्यांना मौत देणार होते. मौत. नक्षलवाद्यांच्या हातून त्यांचा एन्काऊंटर करणार होते. त्यामुळे त्यांचे संरक्षण काढले होते. मुख्यमंत्र्यांना नक्षलींच्या ताब्यात देऊन हत्या घडवून आणण्याचे त्यांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. मी मोठा गौप्यस्फोट करत आहे. जबाबदारीने हा गौप्यस्फोट करत आहे”, असा दावा संजय गायकवाड यांनी केला आहे.

याचबरोबर, “एकनाथ शिंदे गडचिरोली पालकमंत्री असताना त्यांना नक्षलवाद्यांनी धमकी दिली होती. त्यावेळी शिंदे यांना झेडप्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शंभुराजे देसाई गृहमंत्री होते. त्यांच्या घरी बैठक सुरू होती. त्यावेळी मातोश्रीवरून फोन आला आणि एकनाथ शिंदेंना झेड प्लस सुरक्षा देऊ नका, असे सांगण्यात आले. याचा अर्थ काय? तुम्ही त्यांना मारण्यासाठी टपले होते. त्यांना नक्षलींच्या हातून मारायचे होते. त्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदेंना सुरक्षा नाकारली,” असा दावा संजय गायकवाड यांनी केला आहे.

दरम्यान, यावेळी संजय गायकवाड यांनी संजय राऊत यांच्यावरही टीका केली. संजय राऊत ही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे. राऊत यांना मला सांगायचे की, त्यांनी मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्यापेक्षा उद्धव ठाकरे याचा जो ललित पाटील सोबत फोटो आहे, तो फोटो आधी पाहावा. मग उद्धव ठाकरेचे ललित पाटीलशी संबंध कसा? असा आरोप आम्ही करायचा का? याचं आधी उत्तर द्या. बिन बुडाचे आरोप करायचे, सरकारला बदनाम करायचे हा यांचा रोजचा कार्यक्रम झाला आहे, असे संजय गायकवाड म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here