संभाजीराजेंचे वडील शाहू छत्रपती यांनी संभाजीराजेंबाबत मोठं वक्तव्य

0

दि.२८: संभाजीराजेंचे वडील शाहू छत्रपती (Chhtrapati Shahu Maharaj) यांनी संभाजीराजेंबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. संभाजीराजेंनी (Yuvraj Sambhaji Raje) २०१६ मध्ये राष्ट्रपती नियुक्त खासदार होण्यासाठीही आमचा विरोध होता. २००९ मध्ये राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवल्यानंतर त्यांचा पराभव झाला. त्यानंतरची वाटचाल ही व्यक्तिगत आहे. लोकशाहीत प्रत्येकाला वैयक्तिक जगण्याचा अधिकार आहे. मला किंवा छत्रपती घराण्याला कुठलाही निर्णय विचारून घेतला नाही. मी कधीही त्यांना विरोध केला नाही. आतापर्यंत जे निर्णय घेतले ते व्यक्तिगत आहेत. राजकीय संघटना काढून त्यांना पुढे जायचं असेल तर त्यांना शुभेच्छा आहे. पक्ष स्थापन केला असेल तर त्यांना राजकारण जास्त महत्त्वाचं आहे. त्यासाठी त्यांना खासदारकी हवी होती असं शाहू छत्रपती यांनी सांगितले. 

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. या निवडणुकीतून छत्रपती संभाजीराजे यांनी माघार घेतली आहे. घोडेबाजार होऊ नये म्हणून ही निवडणूक लढवणार नसल्याचं संभाजीराजेंनी जाहीर केले. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द मोडला असा गंभीर आरोप संभाजीराजेंनी शिवसेनेवर (Shivsena) केला. त्यानंतर विरोधकांनी हा छत्रपती घराण्याचा अपमान आहे असा आरोप केला. त्यावर पहिल्यांदाच संभाजीराजेंचे वडील शाहू छत्रपती यांनी भाष्य केले आहे. 

शाहू छत्रपती म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर संभाजीराजेंनी स्वराज्य संघटना काढली. त्यामुळे स्वत:च्या बळावर पुढे जाणे किंवा इतर पक्षाचा पाठिंबा घेणे हे दोन पर्याय संभाजीराजेंकडे होते. मागील वेळी राष्ट्रपती नियुक्त खासदारकी घेतानाही आम्ही त्यांना ती घेऊ नये असं मत मांडले होते. परंतु त्यांनी वैयक्तिक तो निर्णय घेतला. त्यानंतर आतापर्यंत त्यांनी राजकीय जी पाऊले उचलली आहेत. त्यात कुठेही आमच्याशी अथवा घरच्यांशी चर्चा केली नाही. यात छत्रपती घराणं कुठे येत नाही. त्यामुळे हा छत्रपती घराण्याचा अपमान आहे असं म्हणता येणार नाही असा खुलासा त्यांनी केला आहे. पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना त्यांनी हे विधान केले. 

त्याचसोबत संजय पवार यांचे शिवसेनेकडून नाव जाहीर होताच स्वत: छत्रपती शाहू महाराजांनी फोन करून त्यांचे अभिनंदन केले. संजय पवार यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला, जो अनेक वर्ष पक्षासाठी झटत होते त्यांना संधी देण्याचं काम शिवसेनेने केले त्याचा आनंद असल्याचं मत छत्रपती शाहूंनी व्यक्त केलं. तसेच शिवसेनेने दिलेला शब्द फिरवला असंही म्हणता येत नाही असं त्यांनी म्हटलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here