मुंबई,दि.13: मौलाना सज्जाद नोमानी (Sajjad Nomani) यांनी मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे आणि 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्वच पक्षांनी ताकद पणाला लावली आहे. दरम्यान, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते मौलाना खलील उररहमान सज्जाद नोमानी यांनी मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. सज्जाद नोमानी म्हणाले की, आपण महाविकास आघाडीच्या 269 उमेदवारांना पाठिंबा देणार असून आपल्या जनतेला त्यांना मतदान करण्यास सांगणार आहे. मराठा आणि ओबीसी समाजातील 117 उमेदवारांना आमचा पाठिंबा आहे, याशिवाय 23 मुस्लिम उमेदवारांनाही पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मागण्यांचे पत्र
यापूर्वी ऑल इंडिया उलेमा बोर्डाने महाविकास आघाडीला 17 मागण्यांचे पत्र पाठवले होते, ज्यात त्यांनी लिहिले होते की, निवडणुकीत पाठिंबा हवा असेल तर या मागण्या मान्य कराव्या लागतील. बोर्डाच्या मागण्यांबद्दल बोलायचे झाले तर त्यातील प्रमुख मागण्या होत्या- वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाला विरोध, नोकऱ्या आणि शिक्षणात मुस्लिमांना १० टक्के आरक्षण देण्याची मागणी, 2012-2024 मध्ये दंगलीच्या आरोपात तुरुंगात टाकलेल्या निरपराध मुस्लिमांची सुटका. महाराष्ट्रातील 48 जिल्ह्यांतील मशीद, दर्गा आणि स्मशानभूमीचे सर्वेक्षण, महाराष्ट्राच्या वक्फ बोर्डाच्या विकासासाठी 1 हजार कोटी रुपयांचा निधी.
महाराष्ट्रात मुस्लिम घटक फार महत्त्वाचा मानला जातो. कारण काही जागा अशा आहेत जिथे मुस्लिम लोकसंख्या इतर धर्माच्या लोकांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे सरकार स्थापनेतही त्यांचा मोठा वाटा असल्याचे मानले जात आहे. महाराष्ट्रात 11 टक्के मुस्लिम मते आहेत. याशिवाय राज्यात जवळपास 120 विधानसभेच्या जागा अशा आहेत, जिथे मुस्लिम मतदारांची मोठी भूमिका दिसत आहे. यापैकी 60 जागा अशा आहेत जिथे 15 टक्क्यांहून अधिक मुस्लिम मतदार आहेत आणि 38 जागांवर 20 टक्क्यांहून अधिक मुस्लिम मतदार आहेत. विधानसभेच्या 9 जागांवर 40 टक्क्यांहून अधिक मुस्लिम मतदार आहेत.