अक्कलकोटचा सुरळीत पाणी पुरवठा प्रश्न मार्गी लागणार: आमदार सचिन कल्याणशेट्टी

0

अक्कलकोट,दि.16: अक्कलकोट शहराचा सदोष वितरण प्रणालीचा फटका बसून नेहमी होणारा अनियमित आणि अपुऱ्या पाणीपुरवठा प्रश्न आता कायमचा मार्गी लागणार आहे. पाणीपुरवठ्यातील सर्व वितरण व्यवस्था दोष दूर करणे या कामासाठी राज्याचे नुतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालून तातडीने पाच कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली आहे.

अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पाठपुराव्याने नवीन सरकारकडून पाच कोटींची भेट ही नवीन पाणीपुरवठा कामासाठी मिळाला असून आता शहरातील नागरिक आणि स्वामीभक्त यांना यापूढे पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही. अक्कलकोट शहरासाठी यापूर्वी वाढीव लोकसंख्या व स्वामीभक्त यांचा विचार करून सुधारित पाणीपुरवठा यंत्रणा नसल्याने आठ दिवसातून एकदा तसेंच अपुरा पाणीपुरवठा व्हायचा त्याने नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत होता तो आता या नव्या सुधारित योजनेने दूर होऊन एक दिवसाआड निश्चित पाणीपुरवठा होणार आहे .सदर काम लवकरच पूर्ण होणार असल्याने नागरिकांची पाण्याची मूलभूत गरज देखील पूर्ण होणार आहे.

सदर कामाचा तपशिल पुढीलप्रमाणे असणार आहे. ज्यात पाणी पुरवठा योजना येथे एक्सप्रेस फिडरलाईन टाकणे, जलशुध्दीकरण केंद्र येथे 20 लाख लिटर क्षमतेची उंच पाण्याची टाकी बांधणे, फिल्टर बेडची क्षमता वाढविणे, नविन फाईटेन बांधणे, नविन पंप हाऊस बांधणे, अनुषंगिक पंपिंग मशिनरी बसविणे. जलशुध्दीकरण केंद्र ते ज्या भागात वितरण व्यवस्थेत आजपर्यंत अडचणी येत आहेत तिथली वितरण व्यवस्था बदलून पुरेशा रितीने पाणीपुरवठा होईल अशा पद्धतीने पाईपलाईन करणे व आवश्यकतेनुसार शहरात ठिकठिकाणी वितरण नलिका टाकणे आदि कामे करणे अपेक्षित आहेत.

नगरपरिषद क्षेत्रात नागरी सेवा व सुविधेची कामे (3604/ 1018) या योजने अंतर्गत अक्कलकोट नगरपरिषद पाणीपुरवठा कामांसाठी रक्कम रुपये पाच कोटी इतका निधी वितरीत करण्यास मंजूरी देण्यात आली आहे.

सदर प्रकल्प खर्चाचा शंभर टक्के हिस्सा राज्य शासनाचा राहणार आहे त्यामुळे ही योजना नजीकच्या काळात पूर्ण होऊन शहरवासिय व स्वामीभक्त यांची कायमची गैरसोय संपणार असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे अक्कलकोटकरांच्या वतीने आभार व्यक्त करित आहे तसेंच या कामासाठी आवश्यकता भासल्यास आणखी निधी देण्याचे दोघांनीही मान्य केल्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here