…पण स्वतः मोदीच अमित शहांना विरोध करतील

0

सोलापूर,दि.२७: RokhThok On PM Modi: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक प्रकृतीचे कारण देत राजीनामा दिला. उपराष्ट्रपती धनखड यांनी कार्यकाळ पूर्ण न करता राजीनामा दिल्यानंतर विरोधकांनी यावर शंका उपस्थित करायला सुरुवात केली आहे. भाजपमधील अंतर्गत कलहामुळे धनखड यांनी राजीनामा दिल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. दैनिक सामनाच्या रोखठोक सदरात संजय राऊत यांनी मोठे दावे केले आहेत.

 

दैनिक सामना रोखठोक | RokhThok On PM Modi

नरेंद्र मोदी यांनीच जगदीप धनखड यांना उपराष्ट्रपतीपदी आणलं. आता मोदींनीच त्यांना घालवलं. भविष्यातील राजकीय घडामोडींची ही सुरुवात आहे. धनखड यांना घालवण्यामागे मोदी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघातला संघर्ष आहे आणि मोदी यांना वाटणारी असुरक्षितता हे एक मोठे कारण आहे. धनखड हे काही कर्तबगार व्यक्तिमत्त्व नव्हतं. दिल्लीत ते आले आणि गेले!

पंतप्रधान मोदी यांनीच नियुक्त केलेले आपल्या देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. गेल्या दहा वर्षांच्या मोदी काळातील दिल्लीत घडलेली ही महत्त्वाची घडामोड आहे. दिल्लीत संसदेचे अधिवेशन सध्या सुरू आहे. पहिल्याच दिवशी 21 तारखेला संध्याकाळी साधारण पाच वाजेपर्यंत उपराष्ट्रपतींची प्रकृती ठणठणीत होती. पाचनंतर भाजप वर्तुळात असे काय घडले की, पंतप्रधान मोदींचा संदेश आला व प्रकृतीचे कारण सांगून धनखड यांनी राष्ट्रपतींकडे राजीनामा पाठवला. श्री. धनखड यांची प्रकृती बरी नसल्याचे एकही लक्षण त्या दिवशी राज्यसभेच्या कामकाजात आढळले नाही (उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती असतात).

11 वाजता नेहमीप्रमाणे कामकाज सुरू झाले. साडेअकरा वाजता विरोधी पक्षनेते श्री. खरगे यांनी पहलगाम हल्ला व ‘आापरेशन सिंदूर’बाबत त्यांची भूमिका मांडायला सुरुवात केली. सत्ताधाऱ्यांनी गोंधळ सुरू केला. खरगे यांचे बोलणे पूर्ण होण्याआधीच त्यांचा माईक नेहमीप्रमाणे बंद केला. धनखड ‘नार्मल’ असल्याचे हे लक्षण मानायला हवे. खरगे बंद माईकसमोर बोलत असताना भाजप अध्यक्ष डा. नड्डा उभे राहिले. त्यांनी ओरडून सांगितले, “खरगेजी, तुम्ही जे बोलताय त्यातले काहीच रेकार्डवर जाणार नाही. मी बोलतोय तेच रेकार्डवर जाईल.” हे वक्तव्य म्हणजे सभापतींच्या अधिकारावर थेट आक्रमण होते.

…पण स्वतः मोदीच अमित शहांना विरोध करतील 

उपराष्ट्रपती धनखड यांच्या राजीनाम्याने दिल्लीच्या पोटातील खळबळ बाहेर आली. भाजपात सगळे आलबेल नाही हे स्पष्ट झाले. मोदींनीच धनखड यांना आणले व मोदींनीच घालवले. सप्टेंबर महिन्यात मोदी 75 वर्षांचे होतील व त्यांनीच केलेल्या नियमानुसार मोदी यांना पंतप्रधान पद सोडावे लागेल. तर मोदींचा वारस कोण? यावर भाजपातच चर्चा सुरू झाली आहे. त्याआधी मोदी उपराष्ट्रपती पदावर कोणाला बसवतात हे पाहायला हवं. राजनाथ सिंहांपासून राज्यपाल मनोज सिन्हांपर्यंत नावे चर्चेत आहेत. मोदी यांच्यानंतर अमित शहांना त्यांच्या खुर्चीवर बसायचे आहे, पण स्वतः मोदीच अमित शहांना विरोध करतील. भाजपाच्या एका ज्येष्ठ मंत्र्यानेच मला हे सांगितले. गुजरातच्या दोन नेत्यांतले संबंध आता वरवरचेच राहिले आहेत. पूर्वीचा गोडवा आता राहिलेला नाही. पंतप्रधान पदाची महत्त्वाकांक्षा असलेल्या एखाद्या नेत्यास मोदी उपराष्ट्रपतीपदी बसवतील अशी दिल्लीची हवा आहे व या सर्व घडामोडीत अमित शहा मला कोठेच दिसत नाहीत.

पंतप्रधान मोदींची पत साफ घसरली

जगदीप धनखड यांनी संसदेच्या सर्वोच्च सभागृहात लोकशाही मूल्यांची बूज राखली नाही. उपराष्ट्रपतींचा राजीनामा व नव्या उपराष्ट्रपतींची निवड या घडामोडीत भाजपचे राजकारण आहेच. देशाची आर्थिक गाडी साफ घसरली आहे व पहलगाम हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान मोदींची पत साफ घसरली. तरीही मोदी जगाच्या नकाशातील देश शोधतात व भ्रमण करतात. देशात फक्त धार्मिक, जातीय तेढ निर्माण करून मोदी राज्य करीत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही आता केंद्रात बदल हवा आहे. सप्टेंबर महिन्यात दिल्लीत अधिक वेगाने घडामोडी घडतील. उपराष्ट्रपतींचा राजीनामा ही त्या घडामोडींची सुरुवात आहे. 75 वर्षांच्या मोदींना पद सोडावे लागेल असे वातावरण आहे. मोदी गेले की शहांचा गडही पडेल व दिल्लीचे आकाश मोकळे होईल. देशात बदलाचे वारे वाहत आहेत. दहा वर्षांत जे घडले नाही ते घडेल. घडायलाच हवे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here