Saamana: राष्ट्रवादी पक्षाला एकाच वेळी दोन कार्यकारी अध्यक्ष नेमण्याची गरज का पडली?

0

मुंबई,दि.12: राष्ट्रवादीतील फेरबदलावर दैनिक सामना (Saamana) अग्रलेखातून भाष्य करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या 25व्या वर्धापनदिनी मोठी घोषणा केली. यानुसार पक्षाच्या नेतृत्व फळीत मोठे फेरबदल त्यांनी जाहीर केले. त्यात खासदार सुप्रिया सुळे यांच्याबरोबर प्रफुल्ल पटेल यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपद दिलं. तर पक्षातील इतर काही नेत्यांकडे जबाबदाऱ्यांचं वाटप केलं. मात्र, या सर्व फेरबदलांमध्ये अजित पवारांकडे कोणतीही जबाबदारी सोपवण्यात आली नाही. त्यांच्याकडे आधीच विधानसभा विरोधी पक्षनेतेपद असल्यामुळे त्यांना नवी जबाबदारी न दिल्याचं शरद पवारांनी नंतर सांगितलं. मात्र, राष्ट्रवादीतील या घडामोडींवर तर्क-वितर्क सुरू झाले असून त्यावर ठाकरे गटाकडून भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या काही नाराजांचा गट भाजपाच्या वाटेवर असून अजित पवार त्यापैकी एक असल्याचा दावा सत्ताधारी पक्षांकडून अनेकदा करण्यात आला आहे. अजित पवारांच्या नाराजीच्या चर्चा यातूनच सुरू असताना त्यावर सामनातील अग्रलेखातून ठाकरे गटानं भूमिका मांडली आहे.

राष्ट्रवादी पक्षाला एकाच वेळी दोन कार्यकारी अध्यक्ष नेमण्याची गरज का पडली?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय दर्जा गमावला आहे. नागालॅण्डमध्ये त्यांचे चार-पाच आमदार निवडून आलेत. राज्याबाहेर लक्षद्वीप येथे त्यांचा एक खासदार आहे. केरळ विधानसभेत त्यांचे एक-दोन सदस्य आहेत. बाकी सर्व कारभार महाराष्ट्रात आहे. त्यामुळे सर्व काही आटोपशीर आहे. मग एकाच वेळी दोन कार्यकारी अध्यक्ष नेमण्याची गरज का पडली? हाच काय तो प्रश्न आहे”, असा मुद्दा अग्रलेखात उपस्थित करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँगेस पक्षापेक्षा अनेक मोठे पक्ष देशाच्या राजकारणात आहेत

“देशाचा आकार पाहता एकाच नेत्याला सर्व भागांत पोहोचणे अवघड असते. त्यामुळे कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी दोघांत वाटून दिल्याचं शरद पवारांनी सांगितले. हे खरे असेलही, पण राष्ट्रवादी काँगेस पक्षापेक्षा अनेक मोठे पक्ष देशाच्या राजकारणात आहेत. त्यांनाही देश मोठा असल्याने दोन कार्यकारी अध्यक्ष नेमण्याची गरज पडली नाही. मात्र शरद पवार यांनी ते केले. कारण त्यांना पक्षातील जुन्या-नव्यांत समतोल राखावा लागत आहे”, असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.

अजित पवारांनाच शर्थ करावी लागेल

“अजित पवार यांना नव्या फेररचनेतून वगळले. त्यामुळे ते दिल्लीतील कार्यक्रमातून निघून गेले वगैरे नेहमीच्या कंड्या पिकविण्यात आल्या. अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातले ‘खिलाडी’ आहेत व राज्याच्या बाहेर पडून काम करण्याचा त्यांचा पिंड नाही. अजित पवार हे विधानसभेतील विरोधी पक्षनेते आहेत व त्यांच्या नेतृत्वाखालचा गट हा भाजपच्या दगडावर पाय ठेवून आहे असे नेहमीच सांगितले जाते. अडीचेक वर्षांपूर्वी त्यांनी फडणवीस यांच्याबरोबर पहाटेचा शपथविधी केल्याचा हा परिणाम. अजित पवार हे भाजपच्या तंबूत जाऊन परत आले हा त्यांच्यावर ठपका आहे व हा ठपका कायमचा दूर करण्यासाठी अजित पवारांनाच शर्थ करावी लागेल”, असा सल्ला ठाकरे गटानं अजित पवारांना दिला आहे.

“महाराष्ट्राची जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्यावर सोपवली गेली आहे व त्यांच्याच प्रभाराखाली पुढच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांची तयारी होईल. मुख्य म्हणजे तिकीट वाटपात त्यांचा अधिकार राहील. महाराष्ट्रात जयंत पाटील हे प्रांताध्यक्ष आहेत व ते शरद पवारांचे अत्यंत विश्वासू आहेत. त्यामुळे जयंत पाटील, सुप्रिया सुळे व अजित पवार या त्रिकुटावर महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचा भार राहील. पक्षाच्या २५ व्या वर्धापनदिनी शरद पवार यांना जे साधायचे ते त्यांनी साधलेच आहे. सुप्रिया सुळे यांना आता कसोटीस उतरावे लागेल”, असंही ठाकरे गटाकडून नमूद करण्यात आलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here