दि.16: चीनचे अधिकृत वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने भारताची बाजू घेत अमेरिकेला फटकारले आहे. भारत आपले म्हणणे ऐकून घेईल, असे स्वप्न पाहणे अमेरिकेने थांबवावे, असे ग्लोबल टाइम्सने लिहिले आहे. ग्लोबल टाइम्सने अमेरिकेला उदयोन्मुख शक्तींशी सामना करायला शिकण्याचा सल्ला दिला आहे.
युक्रेन संकटानंतर भारत आणि अमेरिकेतील अनेक मुद्द्यांवरून मतभेद वाढले आहेत. दुसरीकडे, चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्स रोज अशा प्रकारचे वृत्त प्रकाशित करत आहे, त्यात रशिया-युक्रेन युद्धाबाबत भारताच्या तटस्थ भूमिकेचे कौतुक होत आहे आणि अमेरिकेवर आरोप केले जात आहेत.
ग्लोबल टाइम्सची ही टिप्पणी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S. Jaishankar) यांच्या विधानाच्या संदर्भात आहे, ज्यात त्यांनी मानवाधिकाराच्या मुद्द्यावर अमेरिकेला चोख प्रत्युत्तर दिले होते.
भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या अमेरिकेला दिलेल्या कडक प्रत्युत्तराच्या संदर्भात ग्लोबल टाइम्सने ट्विट केले आहे की, “स्वतंत्र भारताच्या मानवाधिकारावर भाषण करण्याचा अमेरिकेला अधिकार नाही. हीच योग्य वेळ आहे, अमेरिकेने भारताला आपला ग्राहक देश मानण्याचे स्वप्न पाहणे थांबवावे. अमेरिकेने आपली महान नैतिकता स्वतःकडे ठेवली पाहिजे आणि उदयोन्मुख शक्तींशी योग्य रीतीने व्यवहार करायला शिकले पाहिजे.
अमेरिका-भारत टू-प्लस-टू चर्चेनंतर, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी दोन्ही देशांच्या मंत्र्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत एस जयशंकर आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत भारताच्या मानवाधिकार परिस्थितीवर भाष्य केले होते.
ते म्हणाले होते, ‘भारत आणि अमेरिका मानवी हक्कांच्या लोकशाही मुद्द्यांसाठी वचनबद्ध आहेत. भारतातील मानवाधिकार उल्लंघनाच्या काही घटनांवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. भारतातील काही सरकारे, पोलीस आणि तुरुंग प्राधिकरणांकडून मानवाधिकार उल्लंघनाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवांच्या या वक्तव्यावर भारताकडून त्वरित प्रतिक्रिया देण्यात आली नाही, परंतु नंतर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, भारत अमेरिकेतील मानवाधिकार उल्लंघनाच्या प्रकरणावरही लक्ष ठेवून आहे. टू-प्लस-टू चर्चेत दोन्ही देशांदरम्यान मानवी हक्कांवर कोणतीही चर्चा झाली नाही आणि पुढे तसे झाल्यास भारत त्यावर बोलण्यास पूर्णपणे तयार असल्याचे परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले की, सर्व लोकांना आमच्याबद्दल मत ठेवण्याचा अधिकार आहे, परंतु त्याचप्रमाणे आम्हालाही इतरांबद्दल मत ठेवण्याचा अधिकार आहे. जयशंकर म्हणाले की, एक प्रकारची लॉबी आणि व्होट बँक भारताविरुद्ध अशा मुद्द्यांना खतपाणी घालत आहे.