Mohan Bhagwat: हिंदू मुस्लिम बाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचं मोठं विधानं

0

नागपूर,दि.३: Mohan Bhagwat: मुस्लिमांनी न्यायव्यवस्थेचा आदर केला पाहिजे, तर हिंदूंनी दररोज नवी प्रकरणे काढणे टाळले पाहिजे असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी म्हटले आहे. सद्य:स्थितीत देशात ज्ञानवापीच्या मुद्यावर चर्चा सुरू आहे. ही घटना इतिहासात घडली होती. आता हिंदू व मुस्लीम पक्षांनी अतिवादीपणा टाळला पाहिजे. मुस्लिमांनी न्यायव्यवस्थेचा आदर केला पाहिजे, तर हिंदूंनी दररोज नवी प्रकरणे काढणे टाळले पाहिजे. प्रत्येक मशिदीत शिवलिंगाचा शोध का घेता, या शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी दोन्ही समाजांचे कान टोचले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्गाचा गुरुवारी समारोप झाला. त्यावेळी ते बोलत होते.

रेशीमबाग मैदानावर झालेल्या या कार्यक्रमाला भाग्यनगर येथील श्रीरामचंद्र मिशनचे अध्यक्ष दाजी उपाख्य कमलेशजी पटेल हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी महाराज लेईशेम्बा संजाओबा (मणिपूरचे राजे), अनुराग बेहर (सीईओ, अझिम प्रेमजी फाउंडेशन), संजीव सन्याल, कामाक्षी अक्का, सुनील मेहता (अ. भा. सहबौद्धिक प्रमुख) उपस्थित होते.

सरसंघचालक पुढे म्हणाले, आपल्या देशावर आक्रमण केल्यानंतर इस्लामी राज्यकर्त्यांनी हिंदूंच्या आस्थेचे प्रतीक असलेली अनेक मंदिरे तोडली. मुळात हिंदू समाजाच्या मनोबलाचे खच्चीकरण करण्याचा तो प्रयत्न होता. हिंदूंना वाटते की आता अशा स्थानांचा पुनरुद्धार व्हायला हवा; परंतु आताचे मुस्लीम हे आपल्याच पूर्वजांचे वंशज आहेत. ज्ञानवापीच्या मुद्यावर चर्चेतून मार्ग काढायला हवा. जर न्यायालयात कुणी गेले तर न्यायव्यवस्थेच्या निर्णयाचा आदर झाला पाहिजे, असे सरसंघचालक म्हणाले. राम मंदिर आंदोलनात संघ सहभागी झाला होता; परंतु दि. ९ नोव्हेंबर रोजी आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली. आता संघाला कुठलेही आंदोलन करायचे नाही. संघाला कुणाच्याही पूजापद्धतीचा विरोध नाही; परंतु कुणीही दुसऱ्यांच्या धर्मपद्धतीवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करायला नको, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी मंचावर वर्गाचे सर्वाधिकारी अशोक पांडे, विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे, महानगर संघचालक राजेश लोया हे प्रामुख्याने उपस्थित होते. वर्ग कार्यवाह ख्वाई राजेन सिंह यांनी प्रास्ताविकात वर्गाबाबत माहिती दिली.

हिंदू-मुस्लिमांनी अतिवादी लोकांना टोकावे

देशाला विश्वगुरू बनविण्याचा मार्ग एकता व समन्वयातून जातो. जे लोक फाळणीनंतर पाकिस्तानात गेले नाही, त्यांनी येथील परंपरेशी व संस्कृतीशी समरस व्हायला हवे. त्यांनी विखार निर्माण करायला नको. एकमेकांना धमक्या देणे दोन्ही धर्माच्या लोकांनी टाळले पाहिजे. दोन्ही धर्मातील लोकांनी आपल्यातील अतिवादी लोकांना टोकायला हवे, असे सरसंघचालकांनी सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here