Dara Shikoh: RSS औरंगजेबाचा भाऊ दारा शिकोहला खरा मुस्लिम का म्हणते?

0

मुंबई,दि.३०: RSS On Dara Shikoh: RSS औरंगजेबाचा भाऊ दारा शिकोहला खरा मुस्लिम म्हणते. मुघल बादशाह शाहजानचा मोठा मुलगा दारा शिकोहचं वर्णन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने २०१९ मध्ये सच्चा मुस्लिम असं केलं होतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह कृष्ण गोपाल यांनी २०१९ मध्ये दारा शिकोह विषयी हे वक्तव्य केलं होतं. तर मोदी सरकारने दारा शिकोहची कबर शोधण्यासाठी एक समितीही २०२० मध्ये तयार केली आहे. दारा शिकोहला आजच्याच दिवशी म्हणजेच ३० ऑगस्ट १६५९ ला ठार करण्यात आलं. त्याला ठार करुन औरंगजेब गादीवर बसला. दारा शिकोहचं (Dara Shikoh) नाव इतिहासाच्या पानांमध्ये कुठेतरी हरवून गेल्यासारखं झालं आहे.

दारा शिकोह | Dara Shikoh

२० मार्च १६१५ या दिवशी दारा शिकोहचा जन्म राजस्थानातल्या अजमेर या ठिकाणी झाला. बादशाह शाहजान आणि त्यांची दुसरी पत्नी मुमताज महल यांचा मुलगा होता. शाहजानने आपल्या मुलाचं नाव दारा असं ठेवलं कारण फारसी भाषेत दारा या शब्दाचा अर्थ खजिन्याचा मालक असा होता. दारा शिकोहला सख्खे आणि सावत्र असे मिळून १३ बहीण भाऊ होते. या भावंडांमध्ये ६ जण जगले. जहाँ आरा, शाह शुजा, रोशन आरा, औरंगजेब, मुराद बख्श आणि गौहारा बेगम हे त्याचे सावत्र आणि सख्खे बहीण भाऊ होते. १६३३ मध्ये दारा शिकोहचा निकाह झाला. त्याचा पत्नीचं नाव नादिरा बानो होतं.

उदारमतवादी दारा शिकोह

दारा शिकोहचं वर्णन कायम उदारमतवादी असं केलं जातं. कारण इस्लाम धर्मासह दारा शिकोहला हिंदू धर्मातही खूप रस होता. दारा शिकोह हा इस्लामच नाही तर हिंदू, बौद्ध, जैन या सगळ्या धर्मांचा आदर करणारा होता. सगळ्या धर्मांकडे समानतनेते पाहिलं गेलं पाहिजे हे त्याला वाटत असे. दारा शिकोहने अनेक हिंदू मंदिरांच्या निर्मितीसाठी दानही दिलं.

उपनिषिदं जगात पोहचवण्याचं काम

दारा शिकोहचं महत्त्वाचं कार्य हे मानलं जातं की त्याने ५२ उपनिषदं आणि महत्त्वाचे हिंदू धार्मिक ग्रंथ यांचं संस्कृतमधून फारसी भाषेत भाषांतर केलं. हिंदू धर्मातली उपनिषिदं आणि धार्मिक ग्रंथ मुस्लिमांनाही वाचता आली पाहिजेत हा त्याचा यामागचा उद्देश होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर उपनिषिदं आणि हिंदू ग्रंथांचा प्रचार करण्यात दारा शिकोहची भूमिका महत्त्वाची होती. दारा शिकोहने ज्या ग्रंथाचा अनुवाद फारसी भाषेत केला त्या ग्रंथांचा अनुवाद नंतर लॅटीन भाषेतही करण्यात आला. त्यामुळे भारतातली उपनिषदं जगात पोहचली.

शाहजानचा उत्तराधिकारी दारा शिकोह

बादशाह शाहजानला कायमच हे वाटत होतं की दारा शिकोहनेच त्याचा उत्तराधिकारी व्हावं. १६५२ मध्ये शाहजानने दरबारात एक कार्यक्रम बोलवला. त्याने दाराला आसनावर बसवलं आणि शाह ए बुलंद इकबाल म्हणजेच माझा पुढचा उत्तराधिकारी दारा शिकोहच आहे ही घोषणा केली. अनेक इतिहासकार दारा शिकोह विषयी हे सांगतात की दाराला युद्धापेक्षाही तत्त्वज्ञानात जास्त रुची होती.

१६५७ ते १६५९ या कालावधीत काय घडलं?

१६५७ मध्ये शाहजान आजारी झाल्यानंतर मुघल साम्राज्याचा उत्तराधिकारी कोण? याचा वादच पेटला. दारापुढे सर्वात मोठं आव्हान उभं राहिलं ते त्याचा लहान भाऊ औरंगजेब याचं. दारा विरुद्ध औरंगजेब अशी एक लढाईही १६५८ मध्ये झाली. ज्यामध्ये औरंगजेबाचा विजय झाला. या विजयानंतर औरंगजेबाना आग्र्याचा किल्ला ताब्यात घेतला. ८ जून १६५८ या दिवशी आपल्या आजारी वडिलांना म्हणजेच बादशाह शाहजानला औरंगजेबाने तुरुंगात धाडलं. यानंतर मार्च १६५९ या महिन्यात दारा शिकोह आणि औरंगजेब यांच्यात पुन्हा लढाई झाली. या युद्धात दाराचा पुन्हा एकदा पराभव झाला.

दाराचा शिरच्छेद

मार्च १६५९ मध्ये दारा जेव्हा लढाई हरला तेव्हा औरंगजेबाने त्याला साखळदंडाने बांधलं आणि संपूर्ण दिल्लीत त्याला फिरवलं. दारा शिकोह हा भारतात लोकप्रिय ठरला होता. पण या कृतीतून औरंगजेबाला हे दाखवायचं होतं की फक्त जनतेत लोकप्रिय असलेला कुणीही भारताचा बादशाह होऊ शकत नाही. त्यानंतर उजाडला ३० ऑगस्ट १६५९ चा दिवस. या दिवशी औरंगजेबाने दारा शिकोहचा शिरच्छेद केला. एवढं करुनच तो थांबला नाही. त्याने दाराचं शीर एका थाळीत सजवून त्याने शाहजानकडे पाठवलं होतं. आपल्या मुलाचं ते शीर पाहून शाहजानने आर्त किंकाळी मारली होती. काही इतिहासकारांच्या मते दाराचं धड हे हुमायूनच्या कबरीजवळ दफन करण्या आलं तर त्याचं शीर हे ताजमहालाजवळ दफन करण्यात आलं.

२०१७ मध्ये काय झालं?

२०१७ मध्ये संघाचे प्रचारक चमल लाल यांच्या स्मृती दिनाच्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात दारा शिकोहवर चर्चा झाली. त्यानंतर २०१९ मध्ये दारा शिकोह प्रोजेक्टचं काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह कृष्ण गोपाळ यांना सोपवण्यात आलं. दारा शिकोहची माहिती मिळावी यासाठी गोपाळ यांनी काही वर्कशॉप आयोजित केली होती. दारा शिकोहच्या आयुष्यावर संघाने एक प्रोजेक्ट सुरु केला आहे. या प्रोजेक्टच्या अंतर्गत दारा शिकोह, त्याचं आयुष्य त्याने केलेलं भाषांतराचं काम यावर रिसर्च केला जाणार आहे. तसंच दारा शिकोहने जी पुस्तकं लिहिली आहेत त्यांचा अनुवाद इतर भाषांमध्ये केला जाईल. दैनिक भास्करने या विषयीचं वृत्त दिलं आहे.

अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी अर्थात AMU ने याच वर्षी दारा शिकोह सेंटर अंतर्गत संवाद व्हावा यासाठी एका विशेष पॅनलची निर्मिती करण्याची घोषणा केली. या पॅनलमध्ये हिंदू इतिहास या विषयावर रिसर्च करणाऱ्या मुस्लिम आणि ख्रिश्चन विद्यार्थ्यांचाही समावेश करण्यात आला आहे.

मोदी सरकारने नेमली समिती

२०२० मध्ये केंद्राच्या सांस्कृतिक मंत्रालयाने दारा शिकोहची कबर शोधण्यासाठी पुरातत्त्व विषयाच्या अभ्यासकांची एक सात सदस्यीच समिती स्थापन केली. असं मानलं जातं की दारा शिकोहची हत्या केल्यानंतर औरंगजेबाने हुमायूनच्या मकबऱ्यातच दारा शिकोहचा मृतदेह दफन केला होता. या मकबऱ्यात १४० कबरी आहेत. ज्यापैकी हुमायूनची कबर सोडली तर इतर कुठलीही कबर ही कुणाची? हे शोधणं कठीण आहे.

दारा शिकोहचा प्रचार

गेल्या काही वर्षांपासून मोदी सरकार दारा शिकोहचा प्रचार करतं आहे. २०१६ मध्ये दिल्लीतल्या औरंगजेब रोडचं नाव बदलून दारा शिकोह रोड असं करण्यात आलं. तर २०१७ मध्ये राष्ट्रपती भवनाजवळ असलेल्या डलहौसी रोडचं नाव बदलून त्या रस्त्यालाही दारा शिकोह रस्ता हेच नाव दिलं गेलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here