सोलापुरात रोटरी क्लब सुरू करणार वयोवृध्दांसाठी मनोधैर्य योजना

0

     
सोलापूर, दि.9: घरी एकटे राहणारे वयोवृध्दांच्या मदतीसाठी सोलापूर रोटरी क्लबच्या (Rotary Club) वतीने मनोधैर्य योजना सुरू करण्यात येणार आहे. गेल्या 15 वर्षापासून पुण्यासह 25 शहरात आपली सेवा देणाऱ्या मायाकेअर या संस्थेच्या सहकार्याने ही योजना सोलापूरमधील (Solapur) वृध्दांना मोफत सुरू करण्यात येणार आहे. या योजनेचा शुभारंभ शनिवार दि. 11 जून सकाळी 11 वा. एसबीआय हॉल बाळीवेस येथे होणार असल्याची माहिती अध्यक्ष संजय पटेल, सचिव कौशिक शहा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मुले मोठी झाल्यावर त्यांच्या करिअरसाठी ते घराबाहेर पडतात आणि घरी एकटेच वृध्द माता पिता असतात त्यांच्या देखभालीसाठी परंतु मूलभूत गरजा भागविण्यासाठी मुलांकडून काही प्रमाणात व्यवस्था होते मात्र एकटेपणा हा कायम त्यांच्यामध्ये राहात असतो तो दूर करण्यासाठी आणि त्यांना वेळेवर औषधे, भाजीपाला, किराणा साहित्य आणून देणे, दवाखान्यात घेवून जाणे, बँकेत किंवा कोणत्याही सरकारी अथवा खाजगी कार्यालयात काम असेल तेथे काळजीपूर्वक नेवून परत घरी आणणे असे काम करण्यासाठी सोबत कोणीतरी लागतो ही समस्या सर्व ठिकाणी आहे.

परंतु पुणे, मुंबईसह 25 शहरात अशा समस्यावर माया केअर या सामाजिक संस्थेने उपाय काढले आहे. त्यांना काहीही लागल्यास ते आणून देण्यासाठी आणि कुठे बाहेर ये जा करण्यासाठी सोबत राहून आधार देणारे स्वयंसेवक नियुक्त केले आहे. गेल्या 15 वर्षापासून वृध्दांना हे स्वयंसेवक मोफतपणे सेवा देतात. हीच कल्पना माया केअरच्या मदतीने सोलापूरमध्ये सुरू करण्यात येणार आहे. असेही रोटरी क्लब (Rotary Club) सोलापूरचे अध्यक्ष संजय पटेल यांनी सांगितले.

मनोधैर्य योजनेत सहभाग घेण्यासाठी काही तरूणांची स्वयंसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. स्वयंसेवक म्हणून नियुक्त करताना काटेकोरपणे पडताळणी करण्यात आली आहे तसेच त्यांची सर्व माहिती जमा करून ती संबधीत पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.

हे स्वयंसेवक योग्य पध्दतीने काम करतात का यासाठी रोटरी क्लब सोलापूर आणि पोलीस विभाग यांचा सहभाग असलेली समिती तयार करून त्याचा वेळोवेळी आढावा घेण्यात येणार आहे. घरात एकटे असलेल्या वृध्दांना कोणतीही अडचण येणार नाही याची काळजीही घेण्यात आली आहे. केवळ साहित्य आणून देणे असे नाही तर वृध्दांना एकटे वाटू नये म्हणून त्यांच्याशी संवाद करण्यासाठीही स्वयंसेवक प्रयत्न करणार आहेत.

ही नवीन संकल्पना सोलापूरमध्ये शनिवार दि. 11 जून पासून सुरू करण्यात येणार असल्याचेही यावेळी संजय पटेल यांनी सांगितले. मनोधैर्य या योजनेसाठी गेल्या 15 वर्षापासूनचा अनुभव असलेल्या पुण्याचे माया केअरचे संस्थापक संचालक यांचेही मोलाचे सहकार्य लाभणार आहे. मनोधैर्य योजना ही संपूर्णपणे मोफत असून सोलापूरमधील सेवानिवृत्त झालेले आणि वृध्द एकटे राहात असलेल्या नागरीकांनी या योजनेचा लाभ घेवून आपले जीवन सुखद करावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here