मुंबई,दि.१५: Rohit Pawar Tweet: आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विट करत सत्ताधारी पक्षाला इशारा दिला आहे. रोहित पवार यांनी राजकीय आश्रय असणाऱ्या टोळीचा उल्लेख करत थेट इशारा दिला आहे. सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्या पुरोगामी विचारांच्या तरुणांना राजकीय आश्रय असणाऱ्या टोळीकडून त्रास दिला जात आहे. संबंधित तरुणांना नोकरीवरून काढण्यासाठी ते काम करत असलेल्या कंपनीला संपर्क साधून दबाब टाकला जात आहे, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. पुरोगामीत्वावर होणारे हल्ले रोखण्यासाठी वाटेल ती किंमत मोजू पण राजसत्तेच्या आड लपून पुरोगामीत्वावर होणारे हल्ले आम्ही खपवून घेणार नाही, असा इशाराही रोहित पवारांनी दिला.
रोहित पवार यांचे ट्विट | Rohit Pawar Tweet
रोहित पवार ट्वीटमध्ये म्हणाले, “सोशल मीडियावर पुरोगामी विचारांचा एक मोठा तरुण वर्ग आहे. महाराष्ट्रात पुरोगामी विचार टिकावा म्हणून या विचारसरणीच्या नेत्यांना या युवा वर्गाकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठं समर्थन मिळतं. अर्थात काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवार साहेब हे पुरोगामी विचारांचे पाईक असल्याने त्यांना या युवा वर्गाचा मोठा पाठिंबा आहे. त्यादृष्टीने आपल्या लिखाणातून ते सोशल मीडियात वेळोवेळी व्यक्त होत असतात. मात्र या युवावर्गाला एका राजकीय आश्रय असलेल्या टोळीकडून जाणीवपूर्वक त्रास देण्यात येत असल्याचं निदर्शनास आलं आहे. या टोळीमध्ये प्रामुख्याने एकतर महिला आहेत किंवा महिलांच्या नावाने काढलेली अकाऊंट्स आहेत.”
“या टोळीकडून सोशल मीडियात या युवकांच्या अकाऊंटवर अत्यंत गलिच्छ भाषेत कमेंट करुन या युवांनी त्यांच्याविरोधात चुकीची भाषा वापरावी, यासाठी उद्युक्त केलं जातं आहे. त्यांना प्रत्युत्तर दिल्यास महिला असल्याचा गैरफायदा घेत लगेच पोलिसांत तक्रार केली जाते. एरवी महिलांवर अत्याचार होत असताना गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास दिरंगाई करणाऱ्या सरकारच्या दबावाखालील पोलीस यंत्रणेकडूनही या युवांना तत्परतेने अटक केली जाते,” असंही रोहित पवारांनी नमूद केलं.
सत्ताधारी पक्षाला इशारा देताना रोहित पवार पुढे म्हणाले, “याशिवाय पुरोगामी विचारधारेला मानणाऱ्या सोशल मीडियातील या व्यक्ती, मुलं, मुली जिथं कुठं काम करत असतील, त्या कंपन्यांनाही फोन करुन किंवा ई-मेल लिहून यांना कामावरुन काढून टाका, असा दबाव आणला जात आहे. हा अत्यंत हीन, संतापजनक आणि लोकशाहीमध्ये विचार स्वातंत्र्याच्या मुळावर घाव घालणारा प्रकार आहे. एखाद्याची भूमिका पटत नसेल तर थेट त्याच्या नोकरीवर किंवा त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणू पाहणाऱ्या या प्रवृत्तीच्या विरोधात लढण्यासाठी या मुलांच्या बाजूने आम्ही सर्वजण खंबीरपणे उभं आहोत.”
“सर्वसामान्य कुटुंबातील या मुलांचं व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आम्ही कुणालाही हिरावू देणार नाही. यासाठी वाटेल ती किंमत मोजू पण राजसत्तेच्या आड लपून पुरोगामीत्वावर होणारे हल्ले आम्ही खपवून घेणार नाही. राजसत्तेनेही राजकीय विरोधकांविरोधातील विचारांची लढाई समोरासमोर आणि विचारांनीच लढावी. महिलांना पुढं करुन किंवा महिलांच्या नावाने अकाऊंट काढून त्यांच्या पदराआडून हल्ले करणं, हे कोणत्याही राजसत्तेला शोभणारं नाही,” असंही आमदार पवार म्हणाले.