मुंबई,दि.७: राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणावर राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवारांनी मोठे विधान केले आहे. राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) या दोन्ही गटांचे विलिनीकरण होणार असल्याची चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत निधन झाले. त्यानंतर विलीनीकरणावर चर्चा सुरू झाली.
रोहित पवार यांनी गुरुवारी स्पष्ट केले की, पक्षाचे सर्व आमदार, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि संपूर्ण पवार कुटुंब सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा बनवू इच्छित आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत एक मोठे विधानही केले.
गुरुवारी बारामती येथे माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले, “१३ दिवसांचा शोककाळ जाऊ द्या. त्यानंतर सुनेत्रा काकी स्वतः या विषयावर बोलतील.”
त्यांनी स्पष्ट केले की, २८ जानेवारी रोजी अजित पवार यांच्या निधनानंतर, विलीनीकरणाशी संबंधित कोणत्याही मुद्द्यावर कुटुंबात कोणतीही चर्चा झालेली नाही.
आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकरिता मतदान केल्यानंतर रोहित पवार म्हणाले, अजित पवारांची जी इच्छा होती, परिवार म्हणून सर्वजण एकत्र यायला हवे आणि त्याकरिता दादांकडूनही प्रयत्न केला जात होता. सुप्रिया ताई असतील किंवा पवार साहेब आम्ही सर्वजण काहीसा असाच प्रयत्न करत होतो. पवार म्हणून आम्ही एकत्रित आहोत आणि अजित दादांचे जे स्वप्न आहे पवार कुटुंब एकत्र राहिले पाहिजे तसेच काहीतरी होईल. आज कोणीही न ठरवून सर्वजण एकत्र आले. परिवार पुन्हा एकदा एकत्र येत आहे.








