मुंबई,दि.9: उत्तराखंडमधील नैनिताल जिल्ह्यातील हल्द्वानीमध्ये हिंसाचारात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. परिस्थिती इतकी बिघडली की पोलिसांना परिसरात संचारबंदी लागू करावी लागली आणि दंगलखोरांना पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले. या हिंसाचारात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक पोलीस जखमी झाले आहेत.
वास्तविक, हल्द्वानी येथील बनभुलपुरा भागात ‘बेकायदेशीर’ बांधलेला मदरसा आणि मशीद हटवण्यासाठी पोलिस प्रशासनाची टीम गेली होती. कारवाईला सुरुवात होताच संतप्त स्थानिक नागरिकांसह मोठ्या संख्येने महिलांनी रस्त्यावर उतरून कारवाईचा निषेध केला. ते बॅरिकेड तोडताना आणि पाडण्याच्या कारवाईत गुंतलेल्या पोलिसांशी वाद घालताना दिसले.
जेसीबीची कारवाई सुरू असतानाच जमाव हिंसक झाला आणि घोषणाबाजी करत दगडफेक करू लागला. काही वेळातच संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. बुलडोझर चालवण्यासाठी आलेल्या प्रशासनावर हल्लेखोरांनी दगडफेक केली. संतप्त लोकांना शांत करण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीचार्ज केला, ज्यामुळे गोंधळ आणखी वाढला. यानंतर रामनगर येथून अतिरिक्त फौजफाटा मागवण्यात आला आणि बनभूलपुरा पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर पोलिसांनी पुन्हा ताबा घेतला.
दंगलखोरांनी पोलिस स्टेशनला आग लावली आणि डझनभर वाहने जाळली. या गोंधळानंतर संपूर्ण परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली असून हल्लेखोरांवर कारवाई करण्यात येत आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरच अतिक्रमण हटवण्याचे काम झाल्याचा दावा प्रशासन आणि सरकारकडून केला जात आहे. दोन्ही पक्षांनी संयम बाळगायला हवा होता, असे काँग्रेसने म्हटले आहे.