सोलापूर,दि.16: सोलापूर जिल्ह्यामध्ये दि. 05 जानेवारी 2022 ते दि. 05 जानेवारी, 2023 या वर्षभराच्या कालावधीत मतदार नोंदणी वाढण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविण्यात आले. जिल्ह्यातील 11 मतदारसंघांमध्ये एकूण 3 हजार 567 मतदार केंद्रे असून, दि.5 जानेवारी 2023 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली असून, त्यानुसार पुरुष – 18,74,792, स्त्री – 17,21,696 आणि इतर – 249 अशी एकूण 35,96,206 ची मतदार संख्या आहे. उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांनी ही माहिती दिली.
मतदार नोंदणीसाठी विशेष प्रयत्न
भारत वाघमारे म्हणाले, दि. 05 जानेवारी 2023 पर्यंतच्या गत वर्षभरात सोलापूर जिल्ह्यामध्ये मतदार नोंदणीसाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. या कालावधीमध्ये नवीन मतदार नोंदणीसाठी एकूण 1,20,319 अर्ज प्राप्त झालेले असून त्यापैकी 1,00,659 अर्ज मंजूर करण्यात येवून तेवढ्या मतदार संख्येमध्ये वाढ झालेली आहे. तसेच मयत, दुबार व स्थलांतरीत मतदार यांच्या वगळणीसाठी एकूण 96,541अर्ज प्राप्त झालेले असून त्यापैकी 77,245 मतदारांची नावे वगळण्यात आलेली आहेत. मतदारांचे नाव, पत्ता, छायाचित्र इ. दुरुस्त करणेकामी एकुण 99,049 अर्ज प्राप्त झालेले असून त्यापैकी 96,662 इतक्या मतदाराच्या नोंदी दुरुस्त करण्यात आल्या आहेत.
…मुख्य प्रवाहात आणण्याकरिता विशेष प्रयत्न
भारत वाघमारे म्हणाले, तृतीयपंथी व देह विक्री करणाऱ्या महिलांना मुख्य प्रवाहात आणण्याकरिता विशेष प्रयत्न करण्यात आले. त्यांच्याकरिता काम करणाऱ्या संस्थेच्या मार्फत मतदान नोंदणी करण्यासाठी जागृती करण्यात आली. दि. 12 व 13 ऑक्टोबर 2022 रोजीच्या विशेष मोहिमेमध्ये उत्तर सोलापूर, पंढरपूर, टेंभुर्णी, माढा व बार्शी या ठिकाणी तृतीयपंथी व देह विक्री करणाऱ्या स्त्रियांसाठी विशेष कक्षाची स्थापना करण्यात आलेली होती. त्यामध्ये 17 तृतीयपंथी व 20 देह विक्री करणाऱ्या महिला मतदारांनी नोंदणीसाठी अर्ज दाखल केलेले आहेत. गत वर्षभरात जिल्ह्यामध्ये तृतीयपंथी 70 मतदार वाढ झालेले आहेत.
भारत वाघमारे म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयामध्ये दि.12 नोव्हेंबर ते दि.8 डिसेंबर 2022 या कालावधीत विशेष मोहीम राबवून नवमतदारांची नावनोंदणी करुन घेण्यात आली असून, या कालावधीमध्ये 18 ते 19 या वयोगटातील एकूण 10,423 इतक्या नव मतदारांचे नाव मतदार यादीमध्ये समावेश झालेले असून 18 वर्षा खालील एकूण 2,358 इतक्या नव मतदारांचे अर्ज भरुन घेण्यात आलेले आहे.
दि. 11 सप्टेंबर 2022 रोजी सोलापर जिल्ह्यामध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करून, त्यात फॉर्म नं. 6 -5414, फॉर्म नं. 7 – 7286 आणि फॉर्म नं. 8 – 300 याप्रमाणे मतदारांचे अर्ज दाखल करुन घेण्यात आलेले आहेत. मतदार याद्यातील तपशीलाशी जोडण्याकरिता आणि प्रमाणिकरणासाठी मतदारांकडून ऐच्छिकपणे
आधारची माहिती संग्रहीत करण्याच्या कामामध्ये एकुण 35,96,206 पैकी 17,53,306 (48.75% ) मतदारांचे ओळखपत्र आधारकार्डशी सलग्न करण्यात आलेले आहे.