शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांच्या मेव्हण्यावर गुन्हा दाखल

0

मुंबई,दि.16: शिवसेना (शिंदे गट) खासदार रवींद्र वायकर यांच्या मेव्हण्यावर गुन्हा दाखल झाला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात शिवसेना (ठाकरे गट) अमोल कीर्तिकर यांचा 48 मतांनी पराभव झाला. मतमोजणी कक्षात वायकर यांचा मेव्हणा मंगेश पंडीलकर याने मोबाईल वापरल्याचे उघड झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यानेच पंडीलकरला फोन पुरवल्याचे उघड झाले आहे.

वनराई पोलिसांनी वायकर यांचा नातेवाईक मंगेश पंडीलकर आणि निवडणूक आयोगाचा एनकोर ऑपरेटर दिनेश गुरव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आता तपासात पंडीलकर ईव्हीएमशी जोडलेला मोबाइल फोन वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे. पोलिसांनी त्यानुसार इतर उमेदवारांचे जबाब नोंदवले असून, लवकरच याप्रकरणी अटक वॉरंट जारी करण्यात येणार आहे. दैनिक लोकमतने याबाबत वृत्त दिले आहे.

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. मतमोजणी केंद्रात मोबाईल वापरण्याची बंदी असताना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकांनी मोबाईल वापरल्याचा आरोप भरत शाह आणि सुरेंद्र अरोरा या अपक्ष उमेदवारांनी केला होता. मात्र नातेवाईक वायकर यांचा मेव्हणा असल्याचे नंतर उघड झाले.

वनराई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पंडीलकरकडे सापडलेला फोन हा दिनेश गुरव यानेच त्याला दिला होता. हा मोबाइल फोन 4 जून रोजी नेस्को सेंटरमध्ये वापरण्यात आलेले ईव्हीएम मशीन अनलॉक करण्यासाठी आवश्यक असलेला ओटीपी तयार करण्यासाठी वापरला गेला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here