नागपूर,दि.23: आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) गंभीर आरोप केला आहे. उमेश कोल्हे हत्या प्रकरणावरून राणा यांनी ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. उमेश कोल्हे हत्या प्रकरण जाणीवपूर्वक दाबण्यात आलं, कारवाई करू नये यासाठी उद्धव ठाकरे यांनी पोलीस आयुक्त आरती सिंग यांना फोन केला होता.
उद्धव ठाकरेंवर रवी राणा यांचा गंभीर आरोप
उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून या प्रकरणाचा तपास चोरीच्या दिशेनं गेला. त्यामुळे या प्रकरणात पोलीस आयुक्तांची देखील चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी रवी राणा यांनी केली आहे. राणा यांनी ठाकरेंवर केलेल्या आरोपानंतर आता वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

आरोपांवर मंत्री शंभुराज देसाई यांची प्रतिक्रिया
दरम्यान रवी राणा यांच्या आरोपांवर मंत्री शंभुराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्याच्या गुप्तचर विभागाला उमेश कोल्हे प्रकरणासंदर्भात सर्व मुद्दे कळवले जातील. राज्य गुप्तचर विभागाकडून पंधरा दिवसांत उमेश कोल्हे हत्या प्रकरणासंदर्भातला अहवाल मागितला जाईल. त्यानंतर तो आवाहल उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यासमोर मांडला जाणार असल्याचं शंभुराज देसाई यांनी म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?
भाजप नेत्या नुपुर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर मुस्लिम समाज आक्रमक झाला. अनेक ठिकाणी आंदोलनं देखील झाली. याच काळात अमरावतीचे औषध विक्रेते उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. नुपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानं उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे.
मात्र हे प्रकरण उद्धव ठाकरे यांनी जाणीवपूर्वक दाबल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे. तसेच या प्रकरणात उद्धव ठाकरे यांनी पोलीस आयुक्तांना देखील फोन केला होता असं राणा यांनी म्हटलं आहे.