राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य

0

हैदराबाद,दि.28: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य केले आहे. देशात लोकसभा निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. अब की बार 400 पार अशी भाजपाची घोषणा आहे. भाजपा देशाचे संविधान बदलणार असल्याचा आरोप विरोधी पक्ष करत आहेत. अशातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी (28 एप्रिल) आरक्षणाबाबत मोठे वक्तव्य केले.

मोहन भागवत हैदराबादमधील एका शैक्षणिक संस्थेतील कार्यक्रमाला संबोधित करताना म्हणाले, ‘संघ परिवाराने काही गटांना दिलेल्या आरक्षणाला कधीच विरोध केला नाही. आरक्षण आवश्यक असेल तोपर्यंत वाढवावे, असे संघाचे मत आहे. संघ सुरुवातीपासूनच संविधानानुसार सर्व आरक्षणांना पाठिंबा देत आहे. काही लोक खोटे व्हिडिओ प्रसारित करुन संघाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. आरएसएस आरक्षणाच्या विरोधात आहे आणि आम्ही त्याबद्दल बोलत नाही, असा व्हिडिओ प्रसारित केला जातोय. हे पूर्णपणे खोटं आहे. संघ संविधानानुसार सर्व आरक्षणांना पाठिंबा देते,’ अशी प्रतिक्रिया भागवत यांनी दिली.

भाजपा आणि आरएसएस आरक्षण संपवणार असल्याचा आरोप अनेक पक्षांचे नेते करत आहेत. आरक्षणावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या शाब्दिक युद्धादरम्यान मोहन भागवत यांचे हे वक्तव्य महत्वाचे आहे.भागवत यांनी गेल्या वर्षीही नागपुरात बोलताना आरक्षणावर भाष्य केले होते. जोपर्यंत समाजात भेदभाव आहे, तोपर्यंत आरक्षण चालूच राहिले पाहिजे, असे ते म्हणाले होते. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here