Video समोर आल्यानंतर केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी मागितली माफी

रावसाहेब दानवे यांनी जुना Video पुन्हा व्हायरल झाल्यानंतर माफी मागितली

0

मुंबई,दि.५: भाजपा नेते केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचा जुना Video पुन्हा व्हायरल झाला आहे. यानंतर रावसाहेब दानवे यांनी स्पष्टीकरण देत पुन्हा माफी (Raosaheb Danve apologized for viral video) मागितली आहे. मागील काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच भाजापाच्या काही नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलताना वादग्रस्त विधानं केली आहेत. याच कारणामुळे राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. नुकतेच भाजपाचे नेते तथा आमदार प्रसाद लाड यांनी शिवरायांचा जन्म कोकणात झाला, असे विधान केले होते.

काय म्हणाले होते रावसाहेब दानवे?

त्यानंतर केंद्रीय मंत्री तथा भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांचादेखील एक व्हिडीओ समोर आला. या व्हिडीओमध्ये दानवे छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करताना दिसत आहेत. दरम्यान, या व्हिडीओनंतर दानवे यांच्यावरदेखील टीका केली जात होती. हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर दानवे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. सध्या समोर आलेला व्हिडीओ दोन वर्षांपूर्वीचा आहे. त्या विधानाबाबत मी संपूर्ण देशाची माफी मागितली होती. मी सध्या शिवरायांबद्दल असे कोणतेही विधान केलेले नाही, असे स्पष्टीकरण दानवे यांनी दिले आहे.

जाहिरात

रावसाहेब दानवे यांनी दिले स्पष्टीकरण

“काही माध्यमांनी मी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना एकेरी भाषेचा वापर केला, असे वृत्त दिले आहे. मात्र या दोन वर्षांमध्ये मी असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही. दोन वर्षांपूर्वी मी नाशिक दौऱ्यावर होतो. त्यावेळी तेथील पत्रकारांनी मला राज्यपालांच्या बोलण्यावर प्रतिक्रिया विचारली होती. त्यावेळी मी अनावधानाने शिवाजी महाराजांचा एकेरी शब्दांमध्ये उल्लेख केला. तेव्हा माझ्यावर टीकेची झोड उठली होती. त्यानंतर मी तेव्हा समस्त देशवासीयांची माफी मागितली होती. तो व्हिडीओ दोन वर्षांपूर्वीचा आहे,” असे रावसाहेब दानवे म्हणाले.

पुन्हा एकदा मी जनतेची माफी मागतो

“मात्र सध्या हा व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल करण्यात आला आहे. मी ते वक्तव्य काल किंवा आज केल्यासारखे दाखवण्यात येत आहे. माझ्या त्या विधानाची मी तेव्हाच माफी मागितली होती. आताही पुन्हा एकदा मी जनतेची माफी मागतो. आज मी शिवाजी महाराज यांच्याबद्दल असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही. मी ते वक्तव्य आज केल्याचे दाखवले जात असून ते चुकीचे आहे,” असे स्पष्टीकरण रावसाहेब दानवे यांनी दिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here