सोलापूर,दि.8: सोलापूर महानगरपालिकेचे (Solapur Municipal Corporation) भारतीय जनता पार्टीचे उपमहापौर राजेश काळे (Deputy Mayor Rajesh Kale) यांना दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आल्याची माहिती शहर पोलिसांनी बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास दिली.
सोलापूर शहर पोलीस दलाचे पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना माहिती दिली की, उपमहापौर राजेश काळे (Deputy Mayor Rajesh Kale) यांच्यावर सात गुन्हे दाखल होते. त्यांना सोलापूर, उस्मानाबाद, इंदापूर येथून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले तर सेटलमेंट भागातील रहिवासी चेतन नागेश गायकवाड यांनाही दोन वर्षासाठी सोलापूर, उस्मानाबाद, इंदापूर येथून तडीपार करण्यात आले आहे. त्यांच्यावर खून खुनाचे प्रयत्न असे दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत.
उपमहापौर राजेश काळे हे भाजपचे निलंबित नगरसेवक आहेत. त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा, मारहाण असे सात गुन्हे दाखल आहेत. सोलापूर महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांना काळे यांनी अर्वाच्च आणि अश्लील भाषेत शिवीगाळ केली होती. त्या प्रकरणी राजेश काळे यांना पोलिसांनी अटकसुद्धा केली होती. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. राजेश काळे हे महापालिकेत आर. के. या नावाने ओळखले जातात.
सेटलमेंट येथे राहणारे चेतन गायकवाड या युवकासही दोन वर्षासाठी सोलापूर उस्मानाबाद आणि इंदापूर येथून तडीपार करण्यात आले आहे. त्याच्यावर खून, खुनाचे प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल आहेत . सेटलमेंट भागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नागेश गायकवाड यांचे चेतन हे पुत्र आहेत.आज बुधवारी पहाटे पाच वाजता उपमहापौर राजेश काळे यांना विजापूर नाका पोलिसांनी ताब्यात घेतले.