Rajan Patil: माजी आमदार राजन पाटील करणार भाजपात प्रवेश?

0

सोलापूर,दि.18: Rajan Patil News: भाजपा नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) राष्ट्रवादीला मोठा धक्का देऊ शकतात. राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांना भारतीय जनता पार्टीत आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी फिल्डींग लावल्याचे माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसवर राजन पाटील हे काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा आहे. राजन पाटील यांची मोहोळ तालुक्यात मोठी ताकत आहे. राष्ट्रवादीने जे उमेदवार दिला तो राजन पाटील यांच्यामुळे निवडून आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज असलेले माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) व त्यांच्या दोन चिरंजीवाच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोहोळ येथील भाजप युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष संजय क्षीरसागर यांना मंगळवारी (ता. 19 जुलै) मुंबईला तातडीने येण्याची सूचना केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीत नाराज असलेले राजन पाटील यांना भाजपत आणण्यासाठी फडणवीसांनी फिल्डिंग लावल्याचे स्पष्ट होत आहे, त्यामुळे मोहोळमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसू शकतो, अशी चर्चा तालुक्यात जोरदारपणे सुरू आहे.

मी माझ्या ‘जनकल्याण शुगर लिमिटेड’ या साखर कारखान्याच्या कामासाठी मुंबईला चाललो आहे, अशी माहिती क्षीरसागर यांनी दिली. निमित्त जरी साखर कारखान्याच्या कामाचे असले तरी मोठ्या राजकीय घडामोडींबाबत चर्चा करण्यासाठीच क्षीरसागर यांना पाचारण केल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विक्रांत ऊर्फ बाळराजे पाटील यांनी गेल्या साधारण पंधरा दिवसांपूर्वी समाज माध्यमावर पोस्ट करीत भाजप प्रवेशाचे संकेत दिले असल्याची चर्चा तालुक्यात चवीने चर्चेली गेली. त्याच पोस्टच्या पार्श्वभूमीवर माजी सभापती विजयराज डोंगरे यांनीही समाज माध्यमावर पोस्ट टाकून ‘इथे फक्त न्याय असतो, तसेच देशाच्या प्रगतीसाठी महत्त्व दिले जाते’ असे संकेत दिले होते. त्यामुळे या दोन्ही पोस्टची तालुक्यासह जिल्ह्यात मोठी चर्चा रंगली होती.

माजी आमदार राजन पाटील यांच्यासारख्या एकनिष्ठ असणाऱ्या नेत्याची कोंडी झाली, या सर्व गोष्टी वरिष्ठांपर्यंत पोचल्या आहेत, परंतु त्यांनी बघ्याची भूमिका घेतली. वरिष्ठांनी बघ्याची भूमिका घेणे म्हणजे अप्रत्यक्ष उमेश पाटील यांना बळ देण्याची भूमिका असल्याची चर्चा आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मोहोळ तालुक्यात शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थिती लावली होती, पण हा विषय बाजूला पडला. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याबद्दल उघड नसला तरी राजन पाटील समर्थकांचा छुपा रोष आहेच.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी मोहोळ तालुक्यात जनता दरबार आयोजित करून नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न चालवला आहे. निमित्त जरी जनता दरबाराचे असले तरी उमेश पाटील यांनी माजी आमदार राजन पाटील व त्यांच्या सुपुत्रांच्या कार्यशैलीचे वाभाडे काढण्याचा एकमेव कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे उमेश पाटलांचा जनता दरबार राजन पाटलांना जाचक ठरू लागला आहे. त्यामुळे तालुक्यात एक संघ असलेल्या राष्ट्रवादीत दोन गट झाले आहेत.

राजन पाटील व त्यांच्या दोन चिरंजीवांनी राष्ट्रवादी सोडल्यास पक्षाला त्याची जबर किंमत मोजावी लागू शकते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही राजन पाटील व त्यांच्या चिरंजीवांनी राष्ट्रवादी सोडणे फायदेशीर नसल्याचे सूतोवाच केल्याच्या बातम्या माध्यमांतून प्रसिद्ध झाल्या होत्या.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here