Raj Thackeray Sabha: औरंगाबादमधील राज ठाकरेंच्या सभेला मिळाली परवानगी

0

औरंगाबाद,दि.२८: Raj Thackeray Sabha: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) सभेला सशर्त परवानगी मिळाली आहे. येत्या १ मे रोजी अर्थात महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील प्रस्तावित सभेला परवानगी मिळाली आहे. आज सायंकाळी पोलिसांनी एकूण १६ अटी घालत राज ठाकरेंच्या परवानगी दिल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये जातीय तेढ आणि धार्मिक भावना भडकवणारे वक्तव्य करू नये, असं देखील पोलिसांनी म्हटलं आहे.

मनसेचा पाडवा मेळावा आणि ठाण्यातील उत्तर सभेमध्ये राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या भूमिकेवरून मोठा वाद उफाळला होता. या पार्श्वभूमीवर त्यांच्या सभेला परवानगी मिळणार की नाही? यावरून तर्क-वितर्क सुरू झाले होते. यासंदर्भात मनसेकडून परवानगी मिळणारच असा विश्वास व्यक्त करण्यात आला होता. अखेर ती परवानगी देण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.

पोलिसांनी घातलेल्या अटीमध्ये सदर सभा ०१/०५/२०२२ रोजी १६.३० ते २१.४५ या वेळेतच आयोजीत करावी. तसेच कार्यक्रमाचे ठिकाण आणि वेळेत कोणत्याही प्रकारचा बदल करु नये, असं सांगण्यात आलं आहे. तसेच सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी स्वंयशिस्त पाळावी. सभेला येताना व परत जाताना कोणीही आक्षेपार्ह घोषणाबाजी, हुल्लडबाजी, असभ्य वर्तन करु नये, असं म्हटलं आहे. कार्यक्रमा दरम्यान कोणतेही शस्त्र, तलवारी, स्फोटक पदार्थ बाळगु नये, अगर प्रदर्शन करु नये व शस्त्र अधिनियमातील तरतुदीचा भंग करु नये, अशी तंबीही पोलिसांनी दिली आहे.

या आहेत अटी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज ठाकरेंच्या सभेसाठी पोलिसांनी १६ अटी घातल्या आहेत. यानुसार…

१- सभा ४.३० ते ९.३० या दरम्यान आयोजित करण्यात यावी.

२- सभेत सहभागी होणाऱ्यांनी असभ्य वर्तन न करता स्वयंशिस्त पाळावी.

३- सभेसाठी १५ हजाराहून जास्त लोकांना निमंत्रित करू नये.

४- सभेमध्ये शस्त्र, तलवारी, स्फोटकं बाळगू नयेत.

५- वंश, जात, धर्म, भाषा, प्रदेशावरून चिथावणी देणारं वक्तव्य करू नये.

६- पोलिसांनी नेमून दिलेल्या मार्गानंच प्रवास करावा.

७- सभेदरम्यान चेंगराचेंगरी वा गोंधळासारखे प्रकार घडल्यास आयोजक जबाबदार असतील.

८ – सर्व अटींची माहिती आयोजकांनी कार्यकर्त्यांना द्यावी

९- सुव्यवस्था राखण्यासाठी मजबूत बॅरिकेट्स उभारावेत

१०- सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आवाजाच्या मर्यादेचे पालन करावे

११- कार्यक्रमादरम्यान अत्यावश्यक सुविधांना बाधा येणार नाही याची काळजी घ्यावी.

१२- सभेच्या दिवसी वाहतुकीसंदर्भातील अधिसूचना सभेला येणारे वक्ते, कार्यकर्ते यांना बंधनकारक असेल

१३ – सभेसाठीच्या वस्तू, जनरेटरची व्यवस्था आधीच करावी

१४ – सभेदरम्यान अन्नदान किंवा मिठाई वाटप होणार असेल, तर त्यातून विषबाधा होणार नाही याची काळजी घ्यावी

१५ – कार्यक्रमाचं ठिकाण किंवा वेळ यामध्ये कोणताही बदल करू नये

राज ठाकरेंच्या सभेला थेट अयोध्येतून हिंदुत्ववादी संघटनांचे अडीच हजार कार्यकर्ते राज ठाकरेंच्या सभेसाठी येणार आहे. अयोध्येतील हिंदुत्वावादी संघटनांनी राज ठाकरेंच्या सभेला पाठिंबा दर्शवला आहे. या संघटनांचे जवळपास अडीच हजार कार्यकर्ते औरंगाबादमध्ये राज ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठी येणार असल्याची माहिती पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आली आहे. सभेची पूर्णपणे तयारी आम्ही करणार आहोत. स्टेजचं काम दोन दिवसांत पूर्ण होईल, अशी माहिती मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी दिली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here