महाराष्ट्रात एक माणूस पोहोचवला की पवार साहेब मोदींची भेट घेतात, पुढचा माणूस सांगायला: राज ठाकरे

0

ठाणे,दि.१२: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याला शिवाजी पार्कवर जाहीर सभा घेतली होती. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. आज राज ठाकरे यांनी ठाण्यात सभा घेतली. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. “अनेक पक्षाच्या नेत्यांचे जे अकलेचे तारे तोडले, त्याचं उत्तर मला द्यायचं होतं. पत्रकार परिषदेत मला हे उत्तर द्यायचं नव्हतं. मला विषय भरकटवून द्यायचा नव्हता. म्हणून मी अविनाश जाधव यांना ठाण्यात सभेबद्दल विचारलं. काही ठिकाणी वीज नाहीये म्हणून ही सभा दाखवत नाहीयेत असं एकानं सांगितलं. पण आजकाल हे मोबाईलवरही दिसतं. तुमच्या करंटची अपेक्षाच नाही. जम्मूमध्येही ही सभा दाखवली जातेय. अनेक राज्यात ही सभा दाखवली जातेय,” असंही राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांनी ठाण्यात आयोजित उत्तर सभेत अनेक विषयांवर भाष्य केलं. (Raj Thackeray Thane Sabha)

राज ठाकरे म्हणाले, भाषणानंतर काही प्रतिक्रिया आल्या. सुप्रिया सुळे म्हणतात, लाव रे तो व्हिडीओ म्हणणारे एका नोटिशीने बदलतील याचं मला आश्चर्य वाटतं. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की एकाच घरात राहून अजित पवारांच्या घरी रेड पडते, पण तुमच्या घरी रेड पडत नाही याचं कारण मला कळेल का? महाराष्ट्रात एक माणूस पोहोचवला की पवार साहेब मोदींची भेट घेतात, पुढचा माणूस सांगायला. देशमुख गेले, मग परत एक भेट घेतली. अजितचं काय? मग रेड टाकल्या. त्यानंतर परत भेट घेतली, नवाब मलिक फाजीलपणा करतोय. मग नवाब मलिक. नंतर आता संजय राऊतांवर बोलले असं म्हणे. आत काय बोलले माहीत नाही. मी त्यांच्या वाढदिवसाच्या भाषणात बोललो होतो की शरद पवार खूश झाले म्हणजे भीती वाटायला लागते. आज शरद पवार संजय राऊतांवर खूश आहेत. कधी टांगलेला दिसेल कळणारही नाही. यात अनेक काँग्रेसवाले गेलेत. मग उशिरा समजतं की तेव्हा ते बोलले होते, ते आज लागलंय.


“गेल्या निवडणुकीच्या वेळी बहुमत शिवसेना भाजपकडे आल्यावर मतदारांची प्रतारणा केली. पहाटेचा एक शपथविधी झाला, मग तो फिस्कटला. या दोन्हीवर बोलल्यावर ही भाजपची स्क्रिप्ट कुठून आली. हे जे विसरले होते ती मी आठवण करून दिली. जेव्हा मी मोदींवर बोललो तेव्हा मला त्या भूमिका मला नाही पटल्या. उघडपणे बोललो. ईडीची नोटीस आली म्हणून ट्रॅक बदलला असं म्हणतात. मला ट्रॅक बदलायला लागत नाही,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

“माहिती करून घ्यायची नाही, आयएल अँड एफएस नावाची कंपनी होती, मी त्यात होतो. नंतर ते झेपायचं नाही म्हणून एका वर्षात त्यातून  बाहेर पडलो. त्या कंपनीच्यासाठीची नोटीस होती. ती नोटीस आल्यावर मी ईडीच्या कार्यालयात गेलो. शरद पवारांना येतेय म्हणून चाहूल लागली तर यावर एवढं नाटक केलं. हातानं जर पाप केलं नाही तर नोटीसी राजकीय असू दे की कायदेशीर मी भिक नाही घालत त्याला,” असंही ते म्हणाले. उद्या मला एखादी गोष्ट नाही पटली, तर परत विरोध करेन. पण उगाच विनाकारण भाषणाला उभे राहिलेत, टीका करा असं नाही करणार. आता तुम्ही शेण खाल्लंय, आता तुमच्यावर टीका करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

आजही माझं मोदींना सांगणं आहे. दोन मागण्या पूर्ण करा, खूप मोठे उपकार होतील. एक तर देशात समान नागरी कायदा आणा आणि दुसरं देशातल्या लोकसंख्येवर नियंत्रण आणता येईल असा कायदा आणा. आम्हाला आसूया नाही की आमच्याकडे एक आणि तुमच्याकडे पाच-पाच. पण ज्याप्रकारे लोकसंख्या वाढतेय, हा देश एक दिवस फुटेल. या काही गोष्टी देशात होणं गरजेचं आहे. आवश्यक आहेत.

मी उघडपणे मोदींच्या भूमिकांविषयी बोललो. पण काश्मीरमधलं ३७० कलम त्यांनी रद्द केलं, तेव्हा अभिनंदन करणारं पहिलं ट्वीट माझं होतं, असेही राज ठाकरे म्हणाले.

अजानवर राज ठाकरेंनी भूमिका केली स्पष्ट
लॉकडाऊनमध्ये अजित पवारांचा कान साफ झाला असणार. गुढी पाडव्याचा भोंगा ऐकू आला. मी चुकीचं काय बोललो. मशिदींवरच्या भोंग्यांचा आख्ख्या देशाला त्रास होतोय. यात धार्मिक विषय कुठंय? तुम्हाला जी आजान द्यायचीये, ती घरात द्या. शहरांचे रस्ते, फुटपाथ कशाला अडवताय? प्रार्थना तुमची आहे. आम्हाला का ऐकवताय? सांगून तुम्हाला समजत नसेल, तर तुमच्या मशिदीच्या बाहेर आम्ही हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणार!

भोंगे हा धार्मिक नाही, सामाजिक विषय आहे – राज ठाकरे

वातावरण आम्ही बिघडवत नाही. हा धार्मिक विषय नसून सामाजिक विषय आहे. वयस्कर लोकांना, विद्यार्थ्यांना, महिलांना, सगळ्यांना याचा त्रास होतो. एक तर सगळे बेसूर असतात. रस्त्यावर घाण झाली, फुटपाथवर घाण झाली तर ते आपण साफ करतो. मग कानांना त्रास होत असेल, तर भोंगे खाली उतरवलेच पाहिजेत. राज्य सरकारला सांगतो, यातून मागे हटणार नाही. तुम्हाला काय करायचं ते करा. या गोष्टीचा एकदा सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे. परदेशात अनेक ठिकाणी बंदी आहे, तिथे निमूटपणे ऐकता ना? माझ्या परिचयाची मुस्लीम लोकं येऊन सांगतात की तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. असा कोणता धर्म आहे जो इतर धर्मीयांना त्रास देतो?


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here