मुंबई,दि.१९: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी निवडणूक आयोगाला ओपन चॅलेंज दिले आहे. मुंबईतील गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये मनसेचा पदाधिकारी मेळावा आज घेण्यात आला यावेळी ठाकरे यांनी मतदार याद्यातील घोळावरून निवडणूक आयोगाला इशारा दिला आहे. सर्वच विरोधी पक्षांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांची भेट घेऊन मतदार यादीत बोगस मतदार नोंदणी केल्याचा आरोप करत याची चौकशी करावी अशी मागणी केली होती. मतदार यादीतील त्रुटी दूर झाल्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात अशी मागणी करण्यात आली होती.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवडणूक आयोगाला ओपन चॅलेंज
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी निवडणूक याद्यांमधील गोंधळाचा उल्लेख करत निवडणूक आयोगाला जाहीर आव्हान दिलं आहे. जोपर्यंत मतदार यादी पूर्ण स्वच्छ होत नाही, सर्व राजकीय पक्षांचं समाधन होत नाही तोपर्यंत तुम्ही निवडणुका घेऊनच दाखवाच असं आव्हान त्यांनी गोरेगावमध्ये पक्षाच्या पदाधिकारी मेळाव्यात बोलताना दिलं आहे. महाराष्ट्रात जे मतदान होईल ते खरं होईल त्याच दृष्टीकोनातून निवडणूक झाल्या पाहिजेत असं त्यांनी सांगितलं आहे.
एकेका घरामध्ये 800 माणसे असल्याची नावे दिली जात आहेत. जे मतदार नाहीत अशांनाही यादीत दाखवले जात आहे. अशी सगळी खोटी नावे भरून निवडणुकीला सामोरे जाण्याचे या लोकांचे प्लॅनिंग आहे. पण जोपर्यंत ही मतदार यादी पूर्णपणे स्वच्छ होत नाही, सर्व राजकीय पक्षांचे जोपर्यंत समाधान होत नाही, तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊनच दाखवा,” असे खुले आव्हान राज ठाकरे यांनी निवडणुक आयोगाला दिले.








