“भाजपाने टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे नवे खाते उघडण्य़ाची सुरुवात…” राज ठाकरे

0

मुंबई,दि.१६: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपा व राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली आहे. पदवीधर मतदारसंघ निवडणुकीनिमित्त आढावा घेण्यासाठी राज ठाकरे ठाणे दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी पदवीधर मतदान करणार परंतू उमेदवार अंगठेबहाद्दर असला तरी चालेल, यावर टीका केली. याचबरोबर राष्ट्रवादी आणि भाजपावर जोरदार टीका केली. तसेच पुढील आंदोलन कोणते असेल याचेही राज यांनी संकेत दिले आहेत.

प्रमोद नवलकर जेव्हा उभे होते, तेव्हा त्यांनी उमेदवाराचा फॉर्म दाखविला होता. त्या उमेदवाराच्या फॉर्मच्या खाली सही किंवा अंगठा असे लिहिलेले होते. याला म्हणतात लोकशाही. पदवीधरांनी ज्या उमेदवाराला मतदान करायचे तो शिकलेला असला पाहिजे अशी अट नाही. या पदवीधरांच्या मतांवर एक आमदार निवडणूक आणायचा पण तो पदवीधर नसला तरी चालेल अशी कोणती निव़डणूक आहे, असा सवाल राज यांनी केला. 

कोर्टाचे निर्णयही चित्रविचित्र असतात. फटाके कधी लावायचे हे पण आता कोर्ट ठरवणार, सण कसे साजरे करायचे हे कोर्ट ठरवणार. कोर्टाचे आदेश पाळले जात नाही, त्याकडे मात्र कोर्ट लक्ष देणार नाही. मराठी पाट्यांसाठी आंदोलने झाली, त्या मराठी पाट्यांच्या विरोधात इथले व्यापारी कोर्टात जातात. महाराष्ट्रात राहणारे, महाराष्ट्र ज्यांना पोसतोय ते व्यापारी कोर्टात जातात. परंतू सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानेन की प्रादेशिक भाषांमध्ये दुकानांच्या पाट्य़ा असाव्यात असे आदेश दिले. परंतू, सरकारकडून त्याची अंमलबजावणी होत नाही, कदाचित आम्हालाच पुन्हा हात पाय हलवावे लागतील, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. 

भाजपाने टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे नवे खाते…

भाजपाने टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे नवे खाते उघडण्य़ाची सुरुवात केली असावी. तुम्ही काय कामे केलीत यावर निवडणुका लढवा. रामाच्या मोफत दर्शनाचे आमिष कशाला दाखवताय. तुम्ही काय गोष्टी केल्यात त्यावर बोलणे गरजेचे आहे, असे राज ठाकरे म्हणाले. 

रविवारी वर्ल्डकपची फायनल आहे. सेमी आज आहे, बहुधा दोन्ही टीमला तुमच्यापैकी जो सेमी जिंकेल आणि फायनलला जाईल, तर साहबने बोला है हारने को, असे सुद्धा होऊ शकते. लोकसभेच्या निवडणुकीला अजून वेळ आहे, चंद्रावर गेलेले यान लोक विसरलेत, वर्ल्डकप थोडीच लक्षात ठेवणार आहेत, असा टोला राज यांनी मोदी स्टेडिअममधील फायनलवरून लगावला. 

राष्ट्रवादीवर टीका

जात ही गोष्ट अनेकांना प्रिय असते, अनेकांना आवडते. त्याची कारणे वेगळी असतात. स्वत:च्या जातीबाबत अभिमान असणे हे महाराष्ट्रात होत होते. १९९९ मध्ये राष्ट्रवादीची जेव्हा स्थापना झाली त्यानंतर स्वत:च्या जातीपेक्षा दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेश निर्माण करणे हे व्हायला लागले. मी तेव्हा ठाण्यातच म्हणालो होतो असे होऊ लागले तर महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश, बिहार होऊ शकतो. स्वार्थी राजकारणामुळे महाराष्ट्राची इमेजची वाट लावण्याचे प्रकार सुरु आहेत. माझ्या पक्षात जातीपातीला थारा मिळणार नाही, होताना दिसले तरी मी त्याला पक्षापासून दूर ठेवेन, असे राज ठाकरे म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here