हा विषय केवळ मशिदींसाठीचाच नाही तर, मंदिरांवरील भोंगेही खाली आले पाहिजे: राज ठाकरे

0

मुंबई,दि.४: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलेच चर्चेत आले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरें यांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात भूमिका घेतली असून राज्यभरात मनसैनिकांकडून आंदोलन केलं जात आहे. राज ठाकरे यांनी राज्य सरकारला ४ मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. त्यानुसार राज्यभरात अनेक ठिकाणी मनसैनिकांकडून मशिदींसमोर हनुमान चालिसा लावत आंदोलन केलं जात आहे. दरम्यान काही ठिकाणी मशिदींनी भोंग्याचा वापर करणं टाळलं तर काही ठिकाणी मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद झाल्याची स्थिती पहायला मिळाली.

राज्यातील भोंग्यांचा मुद्दा हा सामाजिक आहे. धार्मिक नाही. सणासुदीच्या वेळी, सभेसाठी, एखाद्या काही कारणासाठी ठीक आहे. पण वर्षभरासाठी नाही. तुम्हाला कुणाला ऐकवायचे आहे. आम्हाला नाही ऐकायचे. या भोंग्यांमुळे, आजारी माणसांना महिलांना, लहान मुलांना विद्यार्थ्यांना त्रास होतो. एवढेही समजत नाही, असे म्हणत, माणुसकीपेक्षा यांचा धर्म मोठा? असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.  

राज ठाकरे म्हणाले, हा विषय केवळ मशिदींसाठीचाच नाही तर, मंदिरांवरील भोंगेही खाली आले पाहिजे. ज्या-ज्या गोष्टींचा लोकांना त्रास होईल, ते-ते बंद झाले पाहीजे. विश्वास नांगरे पाटील यांचा मला फोन आला होता. त्यांनी सांगितले, की एवढे अर्ज आले होते. एवढ्यांना परवानगी दिली. पण, महाराष्ट्रातील बहुतांश मशिदी या अनधिकृत आहेत. म्हणजेच त्यावरील भोंगेही अनधिकृतच, मग त्यावर भोंगे लावण्यासाठी सरकार अधिकृत परवानगी कसे देऊ शकते. हे समजण्या पलिकडे आहे. अशी परवानगी कशी दिली जाऊ शकते, असेही राज म्हणाले. एवढेच नाही, तर आम्हाला देताना तुम्ही एक दिवसाची, दहा दिवसांची परवानगी देणार. मग त्यांना वर्षाची परवानगी कशी दिली जाते? असा सवालही राज यांनी यावेळी केला.

दरम्यान राज ठाकरे यांनी दुपारी १ च्या सुमारास पत्रकार परिषद घेत जोपर्यंत भोंगे उतरवले जात नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच हा सामाजिक विषय असून त्याला धार्मिक वळण दिलं तर आम्हीदेखील देऊ असा इशारा त्यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी मशिदींवर भोंग्याचा वापर न करणाऱ्या मौलवींचे आभारदेखील मानले आहेत.

भोंग्यांचा मुद्दा सामाजिक आहे. पण ते त्यांच्या धर्माला घट्ट राहणार असतील, तर आम्हालाही तेवढेच घट्ट व्हावे लागेल. ज्या मशिदींवर सकाळी अजान झाली नाही. त्यांनी पुढेही न्यायालयाच्या आदेशानुसारच ठरलेल्या डेसीबलमध्येच  अजान द्यावी. एवढेच नाही, तर दिवसभरातल्या अजानही  त्याच आवाजात दिल्या गेल्या पाहिजे. अन्यथा हनुमान चालिसा चालणार. आम्हालाही महाराष्ट्रात शांतताच हवी आहे. पण त्यांनी धार्मिक वळण द्यायचा विचार केला, तर आम्हीही धार्मिक वळण देऊ, असेही राज म्हणाले.

हा विषय जोवर निकाली लागत नाही, तोवर हा मुद्दा कायम राहणार. हा प्रश्न केवळ सकाळच्या अजानपुरता नाही. हा विषय दिवसभराचा आहे. जर भोंग्यांचा वापर केला गेला, तर आमचे लोकही त्या-त्या वेळेवर हणुमान चालिसा वाजवणार. एवढेच नाही, तर हा विषय एक दिवसाचा नाही, मी महाराष्ट्र सैनिकांना, हिंदू बांधवांनाही हेच सांगतो, की जिकडे मौलवी ऐकत नाहीत, भोंगे मोठ्या आवाजात वाजतील, तिकडे डबल आवाजात हणुमान चालिसा लावा, असेही राज म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here