सोलापूर,दि.२५: उत्तर सोलापूर तालुक्यातील हगलूर येथील एम. ए. कॅपिटल रेस्टॉरंट ॲन्ड बारवर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून सहा महिलांसह २८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. विदेशी दारूसह साडेचौदा लाखांचे साहित्य जप्त केले आहे.
गुन्हे शाखेचे पथक अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी तुळजापूर रस्त्यावरील मश्रुम गणपतीजवळ असताना त्यांना एम. ए. कॅपिटल रेस्टॉरंट ॲन्ड बारच्या आवारातील हॉलमध्ये बेकायदा विनापरवाना काही महिला अंगावर तोकडे कपडे घालून बीभत्स हावभाव व अंगविक्षेप करून डीजे म्युझिकच्या तालावर अश्लील नृत्य करीत असल्याची माहिती मिळाली. पथकाने ही माहिती वरिष्ठांना कळवून जादा पोलीस कुमक मागवून घेतली.
पोलीस पथकाने त्या डान्स बारवर छापा टाकला. तेथील स्टेजवर सहा महिला अंगावर तोकडे कपडे घालून अश्लील नृत्य करीत होत्या, समोर सोफ्यावर काही प्रेक्षक ग्राहक म्हणून बसलेले होते. तर काही प्रेक्षक स्टेजकडील नर्तकीकडे पाहून अश्लील हावभाव करून संगीताच्या तालावर नाचत असताना सापडले. या कारवाईत बारमधून डी. जे. म्युझिकल साउंड सिस्टीम, दोन कूलर, एक लॅपटॉप, लाईट सिस्टीम, विदेशी दारू व बीअरचा साठा तसेच १५ मोटारसायकली असे एकूण १४ लाख ४६ हजार ७२५ रुपयांचे साहित्य जप्त करून सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे, अनिल सनगल्ले, फौजदार शिवकुमार जाधव, पोलीस अंमलदार संदीप काशीद, श्रीकांत गायकवाड, बापू शिंदे, प्रकाश कारटकर, धनाजी गाडे, आबासाहेब मुंडे, मोहन मनसावाले आदींनी केली.