Rahul Bajaj: नाही राहिले ‘हमारा बजाज’ राहुल बजाज यांचे 83 व्या वर्षी निधन

0

दि.12: Rahul Bajaj: बजाज ग्रुपचे (Bajaj Group) मानद अध्यक्ष राहुल बजाज (Rahul Bajaj) यांचे निधन झाले आहे. 1965 मध्ये बजाज समूहाची सूत्रे हाती घेणारे राहुल बजाज 83 वर्षांचे होते. बजाज यांना न्यूमोनियासह हृदयविकाराचा त्रास होता. गेल्या महिन्यातच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज दुपारी 2.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राहुल बजाज यांच्या निधनामुळे एक संवेदनशील व समाजाशी नाळ जुळलेला उद्योजक हरपला आहे, अशी भावना देशभरात व्यक्त होत आहे.

नेहरूंनी ठेवले ‘राहुल’ हे नाव

राहुल बजाज यांचा जन्म 1938 मध्ये झाला. त्यांचे आजोबा जमनालाल बजाज हे स्वातंत्र्यसैनिक होते, त्यांनी 1926 मध्ये बजाज कंपनी सुरू केली. जमनालाल बजाज यांचा मुलगा कमलनयन बजाज याने 1942 मध्ये बजाज ग्रुपचा ताबा घेतला आणि त्यानंतर लवकरच बजाज ऑटो सुरू झाली. राहुल बजाज यांनी एकदा एका मुलाखतीत सांगितले होते की, राहुल हे नाव त्यांना देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी दिले होते. त्यांच्या कुटुंबाचे नेहरूंशी चांगले संबंध होते.

राहुल बजाज यांनी अर्थशास्त्र आणि कायद्याची पदवी घेतली होती. हॉवर्ड विद्यापीठातून त्यांनी ‘एमबीए’चं शिक्षण पूर्ण केलं होतं. 1965 साली राहुल बजाज यांनी आपल्या पारंपरिक उद्योगाची धुरा हाती घेतली. त्यांच्या नेतृत्वाखाली बजाज ऑटोने नेत्रदीपक प्रगती केली. कंपनीची उलाढाल 7.2 कोटींवरून तब्बल 12 हजार कोटींवर पोहोचली. त्यांच्याच कार्यकाळात बजाज कंपनीने दुचाकी विक्रीमध्ये देशातील आघाडीची कंपनी बनण्याचा मान मिळवला. तब्बल 40 वर्षे त्यांनी उद्योगाचे नेतृत्व केले. त्यानंतर 2005 साली त्यांनी आपले सुपुत्र राजीव बजाज यांच्याकडं कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची सूत्रे सोपवली. तोपर्यंत बजाज कंपनीने आंतरराष्ट्रीय बाजारातही आपले बस्तान बसवले होते.

‘हमारा बजाज’ ने पोहोचवले घरोघरी

यापूर्वी बजाज ऑटो हे प्रामुख्याने 3-व्हीलरचे व्यवहार करत होते. आजही ती जगातील सर्वात मोठी थ्री-व्हीलर निर्यात करणारी कंपनी आहे. पण 1972 मध्ये बजाज ऑटोने ‘चेतक’ ब्रँड नावाची स्कूटर भारतीय बाजारात आणली. या स्कूटरने बजाजला देशाच्या कानाकोपऱ्यात ओळख मिळवून दिली.

बजाज चेतकसाठी, कंपनीने मार्केटिंगसाठी धोरण म्हणून ‘हमारा बजाज’ हे घोषवाक्य तयार केले आहे. या घोषणेने अनेक पिढ्या लोकांच्या मनावर राज्य केले. आजही ही भारतातील सर्वात यशस्वी मार्केटिंग मोहिमांपैकी एक मानली जाते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here