सोलापूर,दि.२४: Radhakrishna Vikhe Patil On Politics: काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. अजित पवारांनी ४० आमदारांच्या सह्यांचे पत्र लिहून ठेवले असल्याचीही चर्चा रंगली होती. अजित पवार भाजपाबरोबर जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. मात्र, अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर स्वतः अजित पवारांनी या चर्चा फेटाळल्या आणि आपण राष्ट्रवादीतच असल्याचं स्पष्ट केलं. मात्र, त्या चर्चांचे पडसाद अजूनही उमटत आहेत. आता राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी “अजित पवार शरद पवारांनाच संभ्रमात ठेवतात”, असं मोठं विधान केलं आहे. ते सोमवारी (२४ एप्रिल) सोलापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
राजकारणात लोकांना संभ्रमात ठेवणं ही शरद पवारांची हातोटीच आहे पण | Radhakrishna Vikhe Patil On Politics
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येत्या काळात मविआ एकत्र लढेल हे आत्ताच सांगता येणार नाही, असं वक्तव्य केलं. त्यावर बोलताना राधाकृष्ण विखे म्हणाले, “मला अजित पवारांबाबतचा एक प्रश्न विचारण्यात आला होता. मी कालही त्याचं उत्तर दिलं आहे. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. राजकारणात लोकांना संभ्रमात ठेवणं ही त्यांची हातोटीच आहे. आता त्यांना अजित पवार संभ्रमात ठेवतात यापेक्षा कोणती मोठी गोष्ट असू शकते.”
मविआमध्ये आता काही अर्थ उरलेला नाही
“त्यांनी काय निर्णय करायचा, त्यांच्या वक्तव्याचा काय अर्थ काढायचा हे मला माहिती नाही. म्हणून मी म्हटलं होतं की, महाविकासआघाडीच्या वज्रमुठीला तडे गेले आहेत. ग्रामीण भागात म्हणतो तसं हे उसणं अवसान आणण्याचा हा प्रकार आहे. मविआमध्ये आता काही अर्थ उरलेला नाही,” असं मत विखेंनी व्यक्त केलं.
“भविष्यात राष्ट्रवादीबरोबर आली तर भाजपा इच्छूक आहे का?” या प्रश्नावर राधाकृष्ण विखे म्हणाले, “भविष्यात राष्ट्रवादीला बरोबर घ्यायचं की नाही हा निर्णय पक्षपातळीवर पक्षाचे नेतेमंडळी घेतात. कुणाला बरोबर घ्यायचं कुणाला नाही हा निर्णय पक्षाने घ्यायचा असतो.”
राधाकृष्ण विखे पाटलांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, “संजय राऊत जी भाषा बोलत आहेत ती कुणाची भाषा बोलत आहेत हा खरा प्रश्न आहे. संजय राऊत स्वतःचं मत व्यक्त करतात की ते आणखी कुणाचा सल्ला घेऊन बोलतात याचा शोध घेण्याची गरज आहे.”