सोलापूर,दि.३० : मुंबई पुणे हैदराबाद हायस्पीड रेल्वे (Bullet Train) प्रकल्पाच्याबाबत आज (गुरुवारी) जिल्हाधिकारी कार्यालयात जनसुनावणी होणार असल्याची व माहिती खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी दिली.
महास्वामी म्हणाले, तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना भेटून या हायस्पीड बुलेट रेल्वेस सोलापुरात थांबा मिळण्यासाठी मागणी केली होती. त्यानंतर सातत्याने पाठपुरावा केल्याने त्यांनी याबाबत सकारात्मकता दर्शविली. सोलापूरचा विकास अधिक गतीने होण्यासाठी सोलापूरमार्गे धावणारी मुंबई-हैदराबाद हायस्पीड रेल्वे अत्यंत आवश्यक आहे.
लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात सोलापूर जिल्ह्यास आध्यात्मिक तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करण्याची मागणी केली होती. पंढरपूर, मंगळवेढा, सोलापूर, अक्कलकोट, हैद्रा, हत्तरसंग कुडल या तीर्थक्षेत्रास विकसित करण्यासाठी व मुंबई, पुणे, हैदराबाद यासोबत सोलापूरला औद्योगिक नगरी म्हणून विकसित करण्यासाठी ही हायस्पीड बुलेट रेल्वे महत्त्वाचे योगदान देणार आहे.
देशाची आर्थिक राजधानी मुंबई तेलंगणाची राजधानी हैदराबाद या दोन्ही सिनेसृष्टी नगरीस ही रेल्वे जोडण्यामध्ये सोलापूर दुवा ठरणार आहे. तसेच सोलापुरातील लाखो तेलुगू बांधव हैदराबाद- सोलापूर असा प्रवास करतात. सोलापूर जिल्ह्यातील ६२ गावांमधून हा मार्ग नियोजित आहे. राष्ट्रीय हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे विस्तृत प्रकल्प अहवाल तयार केला जाणार आहे.
एकंदरीत या सर्व बाबींचा विचार करता सोलापूरच्या विकासाबाबत सोलापूरमार्गे मुंबई हैदराबाद ही हायस्पीड बुलेट रेल्वे होण्यासाठी कटिबद्ध असल्याचे महास्वामी म्हणाले.
याकामी लवकरच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.