PM Modi : काशी-विश्वनाथ कॉरिडॉरचे नुकतेच पंतप्रधान मोदींच्या (PM MODI) हस्ते उद्घाटन करण्यात आले.पण लॉन्च होण्याआधीचा एक व्हिडिओ चांगलाच चर्चेत आहे. काशी-विश्वनाथ कॉरिडॉरच्या उद्घाटन कार्यक्रमापूर्वी पंतप्रधान मोदी थेट कामगारांमध्ये पोहोचले. त्यांच्यासोबत बसून त्यांनी ग्रुप फोटोसाठी पोजही दिली. कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनीही या घटनेचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
एका हॉलमध्ये कामगार बसल्याचे व्हिडिओत दिसत आहे. त्यानंतर पंतप्रधान मोदी सभागृहात आले. तेथे बसलेल्या कामगारांनी टाळ्यांच्या कडकडाटात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत केले. पंतप्रधान मोदींना बसण्यासाठी कामगारांसमोर खुर्ची ठेवण्यात आली आहे. पण मोदी स्वतः ती खुर्ची काढून शेजारी उभ्या असलेल्या व्यक्तीला देतात.
मोदी कामगारांजवळच्या रिकाम्या जागेत बसतात. यासोबतच काही मजुरांना जवळची जागा रिकामी असल्याचे दाखवून स्वत:जवळ बोलावून घेतात. यानंतर ते त्यांच्यासोबत फोटो काढतात. पंतप्रधानांच्या या व्हिडिओचे अनेकजण कौतुक करत आहेत.
काशी-विश्वनाथ कॉरिडॉरच्या उद्घाटनावेळी केलेल्या भाषणात, पीएम मोदींनी कामगारांना श्रेय देताना सांगितले की, या भव्य संकुलाच्या उभारणीत ज्यांचा घाम गाळला गेला आहे, त्या प्रत्येक मजूर बंधू-भगिनींचे मी कृतज्ञता व्यक्त करतो. कोरोनाच्या या प्रतिकूल काळातही येथे काम थांबू दिले नाही. या प्रकल्पात काम करणाऱ्या मजुरांवरही पंतप्रधान मोदींनी गुलाबांचा वर्षाव केला. त्याबद्दल त्यांनी कामगारांचे आभार मानले.